गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पोलीस भरती व्हावी अशी मागणी केली जात होती. राज्यभरात हजारो तरुण पोलीस दलात सामील होण्यासाठी पूर्ण तकदीने अभ्यास करत आहेत. दरम्यान, राज्य सरकारने नुकतेच राज्यात एकूण 15 हजार पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याचे जाहीर केले होते. या पदांसाठी भरती प्रक्रिया नेमकी कधी राबवली जाणार, असे तरुणांकडून विचारले जात होते. असे असतानाच आता सरकारने या भरतीबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानंतर आता पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात असून तरुणांनीही तयारीला लागावे, असे आवाहन केले जात आहे. या निर्णयामुळे आता हजारो तरुणांचे सरकारी नोकर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
सरकारने नेमका काय निर्णय जारी केलाय?
मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नुकतेच पोलीस दलातील 15 हजार 631 पदभरतीचा शासन निर्णय जारी केला आहे. पोलीसदलातील पदं शंभर टक्के भरण्यात येणार आहेत. या निर्णयाअंतर्गत आता जानेवारी 2024 पासूनची रिक्त पदं भरली जाणार आहेत.
कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार?
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार आता पोलीस शिपाई पदासाठी 12 हजार 399 जागांची भरती होणार आहे. तर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण 234 जागा भरल्या जाणार आहेत. बॅण्ड्समन पदाच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. तर सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या एकूण 2 हजार 393 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कारागृह शिपाई पदाच्या एकूण 580 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
ऑगस्ट महिन्यात घेण्यात आला निर्णय
दरम्यान, याआधी 12 ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मान्यता देण्यात आली होती. या मान्यतेनंतर पुढील शासकीय प्रक्रियेला सुरुवात झाली होती. याच प्रक्रियेअंतर्गत आता पोलीस भरती करण्याचा आदेश निघाला आहे. लवकरच पोलीस भरतीसंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले जाणार असून तरुणांनी नोटिफीकेशनकडे लक्ष ठेवावे. तसेच तरुणांनी भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची व्यवस्था अगोदरच करून ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे.