आगामी आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला भारतीय चाहत्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र विरोधानंतरही आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना होता. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ खेळणार आहे. तसेच पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत खेळणार नसल्याचं क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याचा दावा हा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय चांगलेच आक्रमक झाले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या निष्पाप नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्धचा संताप आणखी वाढला. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे या हल्ल्याचा बदला घेतला. तसेच पाकिस्तानची खोड जिरवण्यासाठी त्यांच्यासोबतचे असंख्य व्यवहार बंद करण्यात आले. पाकिस्तानचं पाणी बंद करण्यात आलं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत कोणत्या खेळात न खेळण्याची भावना तीव्र झाली. मात्र त्यानंतरही आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं. तसेच वेळापत्रक जाहीर झाल्यारपासून उभयसंघात 14 सप्टेंबरपासून होणाऱ्या सामन्याला सुरुवातीपासूनच विरोध होता. मात्र त्यानंतरही या सामन्याला ग्रीन सिग्नल दिल्याचं निश्चित समजलं जात आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.
द्विपक्षीय मालिका नाही म्हणजे नाही!
तसेच केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेबाबतही निर्णय घेतल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलाय. भारत-पाकिस्तान यांच्यात भविष्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका होणार नाही. दोन्ही संघ फक्त मल्टी नॅशनल आणि आयसीसी स्पर्धेत एकत्र खेळतील, असं क्रीडा मंत्रालयाने म्हटल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय.
आशिया कपबाबत महत्त्वाचं
दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेत 8 संघ खेळणार आहेत. एका गटात 4 यानुसार या 8 संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई (यजमान) अ गटात आहेत. तर बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग ब गटात आहे. या स्पर्धेतील सामने टी 20 फॉर्मेटने होणार आहेत. या स्पर्धेचा थरार 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान रंगणार आहे.