महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान दिलं जातं. 2025 पासून गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिलं आहे. राज्यतील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये भांडवली अनुदान दिलं जाणार आहे
भजन साहित्य खरेदीसाठी अनुदान
यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांचे आायोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याभरातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे, असा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागानं घेतल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
14 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांनी प्रमाणित केलेल्या भजनी मंडळांना भांडवली खर्चासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भातील अटी व शरतींचा शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. यासाठी ५ कोटी रुपये इतकी तरतूद करणे, असा उल्लेख त्या शासन निर्णयात होता.
ऑनलाईन अर्ज करावा लागणार
भजनी मंडळांना 25 हजार रुपयांचं अनुदान मिळवण्यासाठी https://mahaanudan.org या वेबसाईटवर अर्ज दाखल करावे लागतील. याबाबतचे ऑनलाईन अर्ज दिनांक 23 ऑगस्ट, 2025 ते 06 सप्टेंबर, 2025 या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
अर्ज कसा करायचा?
महाराष्ट्रातील ज्या भजनी मंडळांना भजनाचं साहित्य खरेदी करण्यासाठी 25 हजार रुपयांचं अनुदान मिळवायचं असेल त्यांना पहिल्यांदा https://mahaanudan.org या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करताना प्रथम नोंदणी करावी लागेल. यासाठी भजनी मंडळ कोणत्या प्रशासकीय विभागातील आहे हे निवडावं लागेल, त्यानंतर जिल्हा, तालुका निवड केल्यानंतर गाव किंवा नगर पालिका, नगर पंचायत निवड करावी लागेल. यानंतर भजनी मंडळाचं नाव, भजनी मंडळाचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी नोंदवावा लागेल. यानंतर लॉगीन करुन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.