कोकणवासीयांसाठी एक महत्त्वाचा निर्णय शासन दरबारी घेण्यात आला आहे. मुंबईत अनेक कोकणी माणसं राहतात. ते गणेशोत्सवाच्या काळात गावी जातात. त्यांना शासन दरबारी अनेक वर्षांपासून चाकरमानी असा शब्द प्रयोग करण्यात येतो. या नागरिकांसाठी चाकरमानी हा शब्द गेल्या कित्येक वर्षांपासून प्रचलित झाला आहे. पण हा शब्द अवमानकारक असल्याने तो हटवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. या शब्दाऐवजी कोकणवासीय असा शब्द वापरण्याची मागणी करण्यात येत होती. त्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यांनी ऐन गणेशोत्सवात चाकरमान या शब्दाऐवजी कोकणवासीय असा शब्द वापरण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच याविषयीचे परिपत्रकही काढण्यात येणार आहे.
अनेक संघटनांचा चाकरमानी शब्दाला आक्षेप
चाकरमानी या शब्दातच गुलामी ध्वनीत होते. चाकर म्हणजे सेवक, नोकर तर मानी म्हणजे मानणारा. या शब्दावरुन खल सुरू होता. हा शब्द तसा सर्रास वापरण्यात येत होता. अनेकांच्या तो अंगवळणी पडला होता. चाकरमानी या शब्दाला अनेक संघटनांचा विरोध होता. कोकणातील अनेक संघटनांनी हा शब्द गुलामीचे प्रतिक वाटत असल्याचे म्हटले होते. त्यांनी हा शब्द शासन दरबारी वापरण्यावर आक्षेप नोंदवला होता. अजितदादांनी कोकणातील नागरिकांच्या भावना लक्षात घेत हा शब्द, शासकीय वापरातून वगळण्याचा श्रीगणेशा केला. त्यांनी चाकरमानी या शब्दाऐवजी कोकणवासीय असा शब्द प्रयोग करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. याविषयीचे परिपत्रकही सरकार लवकरच काढणार आहे.
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील तीनही प्रमुख नेत्यांमध्ये बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांमध्ये एक तासांहून अधिक काळ बैठक चालली. महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार की हे पक्ष त्या त्या ठिकाणी स्वबळाची चाचपणी करणार ही बाब समोर आलेली नाही. महाविकास आघाडीकडून ही याविषयीची कोणती घोषणा झालेली नाही. आता निवडणुका तोंडावर आलेल्या असताना चर्चा आणि बैठकांना वेग आल्याचे समोर येत आहे. या बैठकीत नेमकं कोणत्या विषयावर, मुद्दावर चर्चा झाली हे समोर आलेले नाही.