सलमान खानचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस 19’ची सुरुवात आजपासून (24 ऑगस्ट) होत आहे. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सध्या याच शोची जोरदार चर्चा आहे. प्रीमिअरच्या रात्री बिग बॉसमध्ये बरीच धमाल पहायला मिळणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ‘बिग बॉस 19’च्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना विजेतासुद्धा भेटणार आहे. ज्याची घोषणा खुद्द सलमान करणार आहे. बिग बॉस हा शो अनेकांच्या करिअरमधील ‘टर्निंग पॉईंट’ ठरतो. त्यामुळे या शोचं विजेतेपद पटकावणं हे प्रत्येक स्पर्धकाचं स्वप्न असतं. जवळपास 100 दिवस घरात राहिल्यानंतर आणि सर्व आव्हानांना सामोरं गेल्यानंतर विजेत्याची घोषणा होते. परंतु यंदा निर्मात्यांनी शोमध्ये मोठा ट्विस्ट आणला आहे. याची झलक बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये पहायला मिळाली.
‘बिग बॉस 19’च्या घरात एण्ट्री मिळवण्यासाठी यंदा दोन स्पर्धकांमध्ये ऑडियन्स वोटिंगची प्रक्रिया ठेवण्यात आली. यामध्ये युट्यूबर मृदुल तिवारी आणि अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बादशाह यांचा समावेश आहे. या दोघांपैकी एकाला वोटिंगच्या आधारावर विजेता निवडून बिग बॉस 19 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी केलं जाणार आहे. याची घोषणा खुद्द सलमान खान करणार आहे. यामध्ये शहबाजला पछाडून मृदुल घरात सहभागी होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे प्रीमिअरच्या रात्रीच या नव्या सिझनला त्याचा पहिला विजेता मिळणार आहे. अर्थात, बिग बॉस 19 चा खरा विजेता भेटण्यासाठी पाच महिन्यांपर्यंतचा प्रवास पूर्ण करावा लागणार आहे. कारण यंदाचा सिझन तीन नाही तर पाच महिने चालणार आहे.
बिग बॉस 19 मध्ये यंदा सेलिब्रिटींपासून इन्फ्लुएन्सर्सपर्यंत अनेकांचा सहभाग असणार आहे. यामध्ये गौरव खन्ना, मृदुल तिवारी, अमाल मलिक, आवेज दरबार, तान्या मित्तल, अतुल किशन, कुनिका सदानंद, प्रणित मोरे, नीलम गिरी, जीशान कादरी, बसीर अली, नेहल चुजासमा, अभिषेक बजाज, नगमा मिराजकर, अशनूर कौर आणि नतालिया जानोसजेक यांचा समावेश असेल.
यंदाच्या सिझनमध्ये प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट पहायला मिळणार आहेत. ‘बिग बॉस’चा प्रत्येक सिझन आतापर्यंत फक्त तीन महिन्यांचा होता. परंतु यंदाचा एकोणिसावा सिझन पाच महिन्यांचा असेल. परंतु सलमान फक्त तीन महिन्यांसाठीच त्याचं सूत्रसंचालन करणार असल्याचं कळतंय. त्यानंतर सूत्रसंचालनाची जबाबदारी दुसऱ्या सेलिब्रिटीला दिली जाईल.