अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून त्यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. आता 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर आता भारत देखील अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. भारत सरकारने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता अमेरिकेला आणखी एक मोठा दणका बसला आहे.
युरोपमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारतानंतर आता इटली, ब्रिटेन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड आणि ऑस्ट्रिया यांच्यासह अनेक देशांनी अमेरिकेला जाणारी टपाल सेवा रद्द केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा निषेध करण्यासाठी या देशांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रम्प प्रशासनाकडून टॅरिफच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे, ज्यामध्ये 800 डॉलर ( भारतीय रुपयांमध्ये 70 हजार रुपये) पर्यंतच्या वस्तूंवर मिळणारी टॅरिफ सूट रद्द करण्याचा निर्णय 30 जुलै रोजी घेण्यात आला आहे, हा निर्णय आता 29 ऑगस्टपासून लागू होणार आहे. नव्या नियमांबाबत अमेरिकेनं अद्याप स्पष्ट माहिती दिली नसल्यानं अनेक युरोपीयन देशांनी अमेरिकेला जाणारी टपाल सेवा रद्द केली आहे.
भारतानं 25 ऑगस्ट रोजी बंद केली सेवा
भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून टॅरीफ लागू करण्याबाबत आणि वसुलीची प्रक्रिया नेमकी कशी असणार? याबाबत कोणतीही स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे जोपर्यंत सर्व बाजू स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा स्थगित राहणार आहे. त्यानंतर आता भारतानंतर इटली, ब्रिटेन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड आणि ऑस्ट्रिया यांच्यासह अनेक देशांनी अमेरिकेला जाणारी टपाल सेवा रद्द केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ भारतावरच नाही तर जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे, ट्र्म्प यांच्या या धोरणावर अनेक देश नाराज आहेत.