रविवारी (24 ऑगस्ट) येमेनची राजधानी सना या शहरावर इस्रायलने हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर सना या भागात मोठे स्फोट झाले. हे हल्ले इस्रायलने केल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार येमेनचे राष्ट्रपती भवन आणि या देशाच्या क्षेपणास्त्रांच्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून इस्रायलने चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केला आहे. या देशाने अगोदर गाझापट्टीवर हल्ले केले. त्यानंतर लेबनॉन, सिरियावर हल्ले केले. त्यानंतर आता इस्रायलने येमेनवर हल्ला केला आहे. इस्रायलने आतापर्यंत एकूण चार शत्रूंवर हल्ले केल्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे.
पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता मिळू नये म्हणून तसेच पश्चिमी देशांनी तशी घोषणा करू नये म्हणून दबाव टाकण्यासाठी इस्रायलने हे हल्ले केले आहेत, असे बोलले जात आहे. काहीही झालं तरी पॅलेस्टाईनला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळू नये, असी इस्रायलची भूमिका आहे.