मागच्या आठवड्यात राज्यात पावसाने मोठा हाहाकार माजवलाय. अनेक ठिकाणी पूर आली तर शेतीचेही मोठे नुकसान झाले. आता नुकताच भारतीय हवामान विभागाने धडकी भरवणारा इशारा दिलाय. आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. परत एकदा राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळेल. उत्तर कोकणात म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस बरसणार आहे.
या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. यासोबतच भारतीय हवामान विभागाकडून, जम्मू काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्येही पावसाचा मोठा इशारा दिला आहे.
देशासाठी 29 ऑगस्टपर्यंत पावसाचा मोठा इशारा दिला आहे. जोरदार पाऊस सर्वत्र कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर कचराच कचरा दिसू लागला आहे. भरती ओहोटीमुळे नदी नाल्यातील सगळा कचरा समुद्र किनाऱ्यावर फेकला जात असून गेल्या आठ दिवसात मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने 952 मेट्रीक टन कचरा हटवला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात 15 ऑगस्टपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हा कचरा हटवण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेत मुंबईतील स्वराज्यभूमी (गिरगाव), दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांचा परिसर स्वच्छ केला आहे. दिनांक 15 ते 23 ऑगस्ट या आठ दिवसांच्या काळात एकूण 952.5 मेट्रिक टन कचरा हटवण्यात आला आहे. सुमारे 380 कर्मचाऱ्यांनी एकूण 6 संयंत्रांच्या सहाय्याने चोवीस तास राबून हे सहा समुद्रकिनारे पूर्ववत स्वच्छ, सुंदर केले.