राज्यात 17 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत अतिमुसळधार पाऊस झाला, पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं. अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळाला, दरम्यान गेले दोन ते तीन दिवस राज्यात पावसानं उघडीप दिली होती, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. गणेशोत्सव काळात पुणे आणि मुंबईला पाऊस झोडपून काढणार आहे, पुणे, मुंबईसह घाटमाथ्यावर देखील हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यात पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव काळात पुणे आणि मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट माथ्यावर देखील पावसाचा जोर वाढणार आहे. त्याचबरोबर कोकणाला पुढील पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला असून, कोकणातील काही भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला यापूर्वी देखील पावसाचा मोठा फटका बसला होता, आता पुन्हा एकदा विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आल्यानं चिंता वाढली आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात देखील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यासह देशात पावसाचा जोर वाढणार आहे. पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पाऊस झाल्यास त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसल्याची शक्यता आहे.