गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) अगदी उंबरठ्यावरच कल्याण-डोंबिवली परिसरात मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवली वेस्ट येथील एका कलाकेंद्रातील मूर्तीकार अचानक पळून गेल्याने भाविकांची पंचाईत झाली आहे.
मूर्तीकाराच्या फरारीने वाढला गोंधळ
फुले रोडवरील ‘आनंदी कला केंद्रा’तील मूर्तीकार गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस बाकी असतानाच पसार झाला. या घटनेमुळे आधीच मूर्तींचे बुकिंग केलेल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. गणेशभक्तांच्या घरात उद्या बाप्पाचे आगमन होणार असताना आता मूर्ती कुठून आणायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाविकांचा संताप, कलाकेंद्रात गोंधळ
सोमवारी (25 ऑगस्ट) काही नागरिक आपली मूर्ती घ्यायला कलाकेंद्रात पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला. मूर्तीकाराच्या फरारीची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेक नागरिक कलाकेंद्रात धावले. त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला.
बुकिंग करूनही मूर्ती नाही
आनंदी कला केंद्राच्या मालकाने मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींची बुकिंग घेतली होती. मात्र, सर्व मूर्ती तयार करणे अशक्य झाल्याने मूर्तीकाराने पलायन केले, अशी माहिती मिळते. त्यामुळे ज्यांनी पैसे देऊन मूर्ती आधीच बुक केल्या होत्या, ते भाविक सर्वाधिक अडचणीत आले आहेत.
दिसेल ती मूर्ती घेऊन गेले भाविक
भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ आल्याने अखेरीस कलाकेंद्रात ठेवलेल्या “दिसेल ती मूर्ती” लोकांनी उचलून नेली. या प्रकारामुळे गणेशभक्तांचा उत्साह मलिन झाला असून भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.