आशिया कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी आठ संघांनी कंबर कसली आहे. यात भारतीय संघ जेतेपदाचा प्रमुख दावेदार असून गतविजेता आहे. भारताच्या विजयाच्या वाटेत पाकिस्तान आणि श्रीलंकेचा अडसर ठरू शकतो. पण भारताला पाकिस्तानविरुद्ध रणनिती ठरवण्यासाठी आधीच ब्लू प्रिंट मिळणार आहे. 29 ऑगस्टपासून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात ट्राय सीरिज होणार आहे. पाकिस्तानने या ट्राय सीरिज आणि आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघात तेच खेळाडू आहेत. त्यामुळे आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी संघाचं अफगाणिस्तान आणि युएईविरुद्ध कशी कामगिरी राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण या संघाचं नेतृत्वा सलमान अली आगाकडे सोपवलं असून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना डावललं आहे. असं असताना एका टीव्ही शोमध्ये शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाची पिसं काढली आहेत. दुसरीकडे, भारतीय संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे भारताची बाजू भक्कम आहे. पण सामन्याच्या दिवशी नाणं खणखणीत वाजणं आवश्यक आहे.
शोएब अख्तरने सांगितलं की, पाकिस्तान ट्राय सीरिजमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध जिंकणार नाही. ही मालिका संपेल तसं आशिया कपमधून बाहेर असलेल्या बाबर आझमला संघात घेतलं जाईल. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ ट्राय सीरिजमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही तर भारतासाठी चांगली बातमी आहे. कारण या मालिकेतील पाकिस्तानच्या कामगिरीकडे भारतीय संघाचं बारीक लक्ष असेल. काय चुका होतात त्याचं योग्य निरीक्षण करून अमलबजावणी केली जाईल. त्यामुळे आशिया कप स्पर्धेपूर्वीच पाकिस्तान संघावर दडपण वाढलं आहे.
पाकिस्तानला आशिया कप स्पर्धेपूर्वी ही मालिका जिंकणं काहीही करून भाग आहे. कारण पाकिस्तान संघावर त्यांच्याच आजी माजी खेळाडूंनी अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे पाकिस्तानने ही मालिका जिंकली नाही तर आशिया कप स्पर्धेपूर्वी संघात लगेच बदल केले जातील. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या खेळाडूंना बाहेर केलं जाईल. दुसरीकडे, अफगाणिस्तान आणि युएई संघांना लिंबूटिंबू समजून चालणार नाही. मागच्या काही वर्षात या संघात कमालीची सुधारणा झाली आहे. अफगाणिस्तान या स्पर्धेत मोठा उलटफेर करू शकते.