एका अभिनेत्याने भर कार्यक्रमामध्ये त्याच्यासोबत स्टेजवर असलेल्या अभिनेत्रीच्या कमरेला हात लावला. सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.सर्वांसमोर असे कृत्य केल्याने या अभिनेत्याला नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. अभिनेत्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीशी गैरवर्तवणूक करणाऱ्या अभिनेत्याचे नाव पवन सिंह असे आहे. तो भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने भोजपुरी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. पवन सिंह आणि त्यांची सहकलाकार, अभिनेत्री अंजली राघव यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता पवन सिंह आणि अभिनेत्री अंजली राघव हे एका कार्यक्रमामध्ये सोबत होते. तेव्हा स्टेजवर अंजली काहीतरी बोलत असल्याचे पाहायला मिळते. तेव्हा तिच्या बाजूला असलेला पवन सिंह हातात माइक घेऊन उभा असतो. पवन सिंह मध्येच अंजलीच्या कमरेकडे पाहतो आणि कमरेत हात घालतो.
‘तिथे काहीतरी लागलंय. हात बाजूला घे’ असे म्हणत अंजलीच्या कमरेला पवन सिंह स्पर्श करताना व्हिडीओत दिसते. तेव्हा अंजली काहीशी अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळते. पण तेव्हाही ‘अरे हात बाजूला घे’ असे म्हणत पवन तिच्या कमरेवर हात फिरवतो. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यांमध्ये कैद करुन घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
भर कार्यक्रमात अभिनेत्रीच्या कमरेला सर्वांसमोर स्पर्श केल्याने भोजपुरी स्टार पवन सिंहला ट्रोल केले जात आहे. या कृतीला नेटकऱ्यांनी अश्लील म्हटले आहे. अभिनेत्रीला अशा प्रकारे स्पर्श करणे चुकीचे आहे असे अनेकांनी म्हटले आहे. या एकूण प्रकरणावर पवन सिंहने अजूनतरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे म्हटले जात आहे.