मुंबईत तब्बल १४ मानवी बॉम्ब घुसले असून, तब्बल ३४ गाड्यांचा वापर करून ते ४०० किलो आरडीएक्सचे बॉम्बस्फोट घडवतील, अशी धमकी देणाऱ्या अश्विन कुमार सुप्रा (५०) याला मुंबई गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक केली.
तो मूळचा बिहारचा आहे. धमकी देण्यासाठी वापरलेला त्याचा फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले असून त्याला नोएडाहून मुंबईत आणले जात आहे.
आज होणाऱ्या गणपती विसर्जन सोहळ्यासाठी महामुंबईत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात होत असतानाच ही धमकी आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. मुंबई पोलीस असा कोणताही मेसेज सहज घेत नाहीत. या मेसेजचीही गंभीर दखल घेत पोलीस मेसेज पाठवणाऱ्या मोबाईल नंबरपर्यंत पोहोचले आहेत. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी या धमकीचा समांतर तपास केला.
मुंबईच खतम करण्याचा मनसुबा या मेसेजमध्ये बोलून दाखवला होता. मुंबईत घुसलेल्या अतिरेक्यांमध्ये एक फिरोज नावाचा अतिरेकी असल्याचे सांगत या मेसेजमध्ये शेवटी लष्कर-ए-जिहादी या आजवर न ऐकलेल्या संघटनेचा उल्लेख केला होता. या मेसेजनंतर आधीच कडक असलेला बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला. सर्वत्र गस्त वाढवण्यात आली. नाकाबंदीही सुरू झाल्या. हा खोडसाळपणा करून मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज होता, तरीही पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले.