रविवारी लाल बागच्या राजचे जवळपास 33 तासांनंतर विसर्जन पार पडलं. गिरगाव चौपाटीवर हे विसर्जन जवळपास 13 ते 14 तास रखडलं होतं. विसर्जनासाठी मागवलेला गुजरातहून खास तराफा अडचणी निर्माण करत होता. त्यामुळे विसर्जनला वेळ लागला आणि चंद्र ग्रहणाच्या वेळेत हे विसर्जन पार पडले. त्यानंतर अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मुख्यमंत्र्यांना पत्र ईमेलद्वारे पत्र लिहित 4 मागण्या केल्या आहेत. आता या मागण्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊया…
लाल बागच्या राजाचे विसर्जन हे चंद्र ग्रहण सुरु असताना झाल्याने लाखो गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शारीरिक आणि मानसिक छळ सुरु असल्याचे इमेलमध्ये म्हटले आहे. तसेच भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नये या करीता मंडळातील कार्यकारी समितीतील सदस्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केली आहे.
कोळी समाजातील महिलांनी केली स्थापना
सन १९३४ साली लालबागच्या राजाची स्थापना कोळी समाजातील मासे विक्रेत्या कोळी महिलांनी केली असल्याचा इतिहास आहे. कोळी महिलांचे अस्तित्व टिकविण्याकरिता बाप्पांचा नवस ठेवल्यामुळे कोळी महिलांच्या मनोकामना पूर्ण झाल्याने बाप्पांची स्थापना लालबाग येथे करण्यात आली होती. कालांतराने अनेक गणेश भक्तांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होऊ लागल्याचा अनुभव आल्यानंतर लालबागचा राजा गणपती नवसाला पावणारा गणपती असल्याची भावना निर्माण झाली. याच भावनेने लाखो गणेश भक्त दरवर्षी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात.
समितीने केल्या चार मागण्या
ज्या सामान्य बापाच्या लेकराला अमानुष रित्या मंडळाच्या कार्यकर्त्याने वागणूक दिली होती त्या कार्यकर्त्याला अथवा, ती व्यक्ती पोलिस दलाचा अधिकारी अथवा कोणा बड्या उद्योगपतीचा खाजगी सुरक्षा रक्षक असल्यास अशा इस्मानांना अटक करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बाप्पांचे विसर्जन चंद्र ग्रहणात झाल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे विसर्जन प्रक्रियेची चौकशी करून मंडळाच्या कार्यकाळी मंडळातील व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. वर्षानुवर्षे विसर्जन सोहळा हा मुंबईतला कोळी बांधव करत आलेले आहेत आणि यावर्षी यावर्षी पहिल्यांदाच कोळी बांधवांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विसर्जन घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. हा फक्त बाप्पांचा अपमान नसून तो समस्त कोळी समुद्राचा आणि लाखी हिंदू भाविकांचा सुद्धा अपमान आहे. घडलेल्या प्रकारची सखोल चौकशी करून दोषी गुन्हेगारांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रार अर्जात प्रामुख्याने लालबागच्या राज्याचे दर्शन प्रक्रियेत तातडीने बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दर्शनासाठी होणारी अफाट गर्दी आणि व्हीआयपी संस्कृतीला आटोक्यात आणण्याकरिता दर्शन प्रक्रियेत मध्ये बदल करून व्हीआयपी दर्शनासाठी फक्त एक दिवस देणे. तसेच चेंगराचेंगरीचा प्रकार घडू नये म्हणून देखाव्याचे पंडाल बंधिस्त अवस्थेत न ठेवता ते मोकळ्या करण्यात यावे जेणेकरून सामान्य जनतेला बाप्पांचे दर्जन घेणे सोपे होईल अशी मागणी करण्यात आली आहे.
ज्या समुदायाने बाप्पांची स्थापना लालबाग येथे केली आहे त्याच कोळी समुदायाला डावलण्याचे काम मंडळाकडून होत आहे. लालबागचा राजा आता एका बड्या भांडवलदारांचा मालकीचा गणपती होऊन गेला असल्याची धारणा होऊ लागली आहे. पुण्यात मानाचा गणपतीची संस्कृती शेकडो वर्षांपासून आजही प्रचलित आहे. त्याच धर्तीवर लालबागच्या राज्याला सुद्धा हिच संस्कृती सुरू करण्याची मागणी केली आहे. कोळी समुदायाला लालबागच्या राज्याचे विसर्जनाचा मान शाबूत करण्यात यावा, एक दिवस आगरी-कोळी बांधवांसाठी राखीव ठेवण्याची मागणी मच्छिमार समितीने कडून करण्यात आली आहे.
बाप्पांवर कोणाची मालकी नसल्याचे स्पष्ट चित्र विसर्जनावेळी दिसून आले आहे. गणपती हा सर्वांचा आहे कोणा एका श्रीमंताच्या मालकीचा नाही. ज्या निरागस भक्तांकडे आयुष्यात काहीच नाही अश्याच भक्तांकडे बाप्पा खऱ्या अर्थाने येत असतो आणि हे लालबाग येथील मासळी विक्रेत्या कोळी महिलांनी सत्तर वर्षांपूर्वी सर्वांना दाखवून दिले आहे. कारण आज लालबाग गणेशोत्सव मंडळाकडे करोडीची संपती आल्यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांना आज जो काही माज चढला आहे तोच माज उतरविण्यासाठीच जणू बाप्पांनी मंडळातील कार्यकर्त्यांकडून विसर्जन घडवून न आणता कोळीवाड्यातील कष्टकरी कोळी बांधवांच्या हस्ते विसर्जन घडवून आणले असे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.