टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून भारत आणि श्रीलंकेकडे यजमानपद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. या स्पर्धेसाठी 20 पैकी 15 संघांनी नावं निश्चित केली आहेत. यात भारत श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज,न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, नेदरलँड आणि इटली या संघांनी जागा पक्की केली आहे. तर उर्वरित पाच संघापैकी दोन संघ अफ्रिकेतून पात्र ठरतील. तर तीन संघ आशिया आणि पूर्व आशिया भागातून पात्र ठरतील. या स्पर्धेसाठी पाच-पाच संघांचे चार गट केले जातील. प्रत्येक गटातून दोन संघांना सुपर 8 फेरीत जागा मिळेल. त्यानंतर बाद फेरीचे सामने खेळले जातील. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत असेल हे आधीच निश्चित झालं आहे. पण आता संभाव्य तारखा पुढे आल्या आहेत.
ईएसपीएल क्रिकइन्फोच्या एका रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान खेळली जाईल. ही स्पर्धा भारतातील पाच आणि श्रीलंकेतील दोन ठिकाणी खेळली जाईल. पण कोणता सामना कुठे होईल हे मात्र निश्चित नाही. आयसीसी या वेळापत्रकाला अंतिम स्वरूप देत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांना देखील माहिती दिली आहे.पण पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार हे निश्चित आहे. तर इतर संघांचे सामने पाकिस्तानच्या गटाप्रमाणे निश्चित केले जातील. दुसरीकडे अंतिम फेरीचा सामना नेमका कुठे खेळला जाईल यावरही संभ्रम असणार आहे. रिपोर्टनुसार, अंतिम फेरीचा सामना अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान संघावर ठिकाण ठरवलं जाईल. पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर कोलंबोत आणि नाही तर अहमदाबादमध्ये होईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती आहे. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय पाकिस्तानात गेला नव्हता. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवली गेली होती. तर पाकिस्ताननेही भारतात सामने खेळणार नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होतील. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात या स्पर्धेत उतरणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेपूर्वी आशिया कप स्पर्धेत या संघाची लिटमस टेस्ट पार पडणार आहे. भारतीय संघ आणि खेळाडू कसे कामगिरी करते याकडे लक्ष लागून असणार आहे.




