Tuesday, September 16, 2025
Homeसांगलीसांगलीतील दोघांना तब्बल 37 लाखांचा गंडा

सांगलीतील दोघांना तब्बल 37 लाखांचा गंडा

बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची चौकशी करायची आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. बँक खात्यातून व्यवहार झाले की नाही, याची पडताळणी करावी लागेल. यासाठी बँक खात्यात रक्कम भरावी लागेल

 

चौकशी पूर्ण झाल्यानंतर 24 तासात रक्कम परत मिळेल, असे सांगून सांगलीतील व्यावसायिक व नोकरदाराला तब्बल 37 लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी अंमलबजावणी व सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगणार्‍या तोतयांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लक्ष्मण विठ्ठल कुलकर्णी व मंगेश रघुनाथ पंडित यांनी फिर्याद दिली आहे.

 

लक्ष्मण कुलकर्णी हे सांगलीतील व्यावसायिक आहेत. त्यांना दि. 31 ऑगस्टरोजी एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यांना ‘तुमचा हा मोबाईल क्रमांक बंद होईल. अधिक माहितीसाठी 9 दाबा’, असे सांगण्यात आले. त्यानुसार कुलकर्णी यांनीही 9 क्रमांक दाबला. त्यानंतर समोरून बोलणार्‍या व्यक्तीने आपण अंमलबजावणी विभागातून बोलत असल्याची बतावणी केली. ‘तुमच्या नावे असलेल्या मुंबईतील खारघर येथील बँक खात्यातून दि. 5 सप्टेंबररोजी नरेश गोयल याच्या खात्यावर बेकायदेशीररित्या सहा कोटींचा व्यवहार झाला आहे. त्यासाठी तुमच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल झाला असून त्यासाठी तीन वर्षांची शिक्षा आहे’, असे फोनवरून बोलणार्‍या व्यक्तीने कुलकर्णी यांना सांगितले. या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांना सांगण्यात आले. कारवाई टाळायची असेल, तर तुमच्या खात्याची चौकशी करावी लागेल. त्यासाठी दिलेल्या बँक खात्यावर 27 लाख रुपये भरा, असे सांगितले.

 

तसेच ‘जर तुमच्या बँक खात्यातून बेकायदेशीररित्या व्यवहार झाले नसतील, तर भरलेली रक्कम 24 तासात परत करण्यात येईल’, असेही सांगण्यात आले. त्यानुसार कुलकर्णी यांनी संबंधित बँक खात्यावर 27 लाख रुपये भरले, परंतु 24 तास उलटून गेल्यानंतरही भरलेली रक्कम परत मिळाली नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

आणखी एका घटनेत मंगेश पंडित यांना सीबीआयमधून शिवप्रसाद व सीमी मॅडम बोलत असल्याचे सांगून फोन करण्यात आला. ‘तुमचे आधारकार्ड दिल्ली ह्युमन ट्रॅफिकिंग केसमध्ये असलेल्या सदाकत खान याच्याकडे सापडले आहे. त्याच्याविरुद्ध नॅशनल सिक्रेट अ‍ॅक्ट 1923 प्रमाणे चौकशी सुरू आहे. तुमच्या आधारकार्डचा वापर करून मुंबईतील बँक खात्यातून 3 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. त्याचे कमिशन म्हणून तुम्हाला 30 लाख रुपये मिळाले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तुम्हाला अटक करावी लागेल. अटक टाळायची असेल, तर दिलेल्या बँक खात्यावर 10 लाख रुपये पाठवा. संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यात येईल. खात्यामध्ये काही बेकायदेशीर न आढळल्यास ही रक्कम परत देण्यात येईल’, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार पंडित यांनी रक्कम भरली. परंतु 24 तास उलटून गेल्यानंतरही ही रक्कम परत मिळाली नाही.

 

याप्रकरणी दोघांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात वेगवेगळी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अंमलबजावणी विभाग आणि सीबीआयमधील अधिकारी असल्याची बतावणी करणार्‍या तोतयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -