आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात युएईचा धुव्वा उडवला. तर पाकिस्तानने ओमानला पराभूत केलं आहे. त्यामुळे अ गटातून पुढच्या फेरीसाठी महत्त्वाचा सामना या दोन संघात होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला थेट सुपर 4 फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर एका संघाला पुढच्या सामन्यातील विजयावर अवलंबून राहावं लागणार आहे. असं असलं तरी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सुपर 4 फेरीत पात्र होण्याची दाट शक्यता आहे. कारण ओमान आणि युएई संघांची पहिल्याच सामन्यात नाजुक स्थिती राहिली असून नेट रनरेट खूपच पडला आहे. अशा स्थितीत भारत पाकिस्तान संघाला सुपर 4 फेरीची सर्वाधिक संधी आहे. इतकंच काय तर हे दोन्ही संघ या स्पर्धेत तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात. सुपर 4 फेरीत हे दोन्ही संघ पात्र ठरले तर तिथे भारत पाकिस्तान संघाची भिडत होईल. त्यानंतर अंतिम फेरीतही हे दोन संघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे.साखळी फेरीतील पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. त्यानंतर सुपर 4 फेरीत पुन्हा एकदा आमनेसामने येतील. सुपर 4 मधील चारही संघ एकमेकांशी प्रत्येकी एक म्हणजेच प्रत्येक संघ तीन सामने खेळेल. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना सुपर 4 फेरीत होईल. सुपर 4 चा टप्पा 20 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 26 सप्टेंबरपर्यंत चालेल. या फेरीत एकूण सहा सामने होणार आहेत.त्यापैकी पाच सामने दुबईमध्ये आणि एक अबू धाबीमध्ये होईल. तर सुपर फोर पॉइंट टेबलवरील पहिला आणि दुसरा संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील.
भारत पाकिस्तान सुपर 4 फेरीत टॉपला राहिले तर अंतिम फेरीत पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. सुपर फोर फेरीसाठी पात्रता होण्यासाठी संघांना त्यांच्या संबंधित गटात अव्वल दोन स्थानात जागा मिळवावी लागेल. म्हणजेच तीन पैकी 2 सामने जिंकले तर पात्र होऊ शकतात. दरम्यान, गट ब मध्ये मात्र कठीण स्पर्धा असणार आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे सुपर 4 च्या दोन स्थानांसाठी लढत आहेत. या पैकी कोणते दोन संघ सुपर 4 फेरीत प्रवेश करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, अंतिम फेरीचा सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.