दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज असलेला ‘दशावतार’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय.
या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला तगडी कमाई केली आहे. गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांच्या तुलनेत ‘दशावतार’ला प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली आहे. शिवाय माऊथ पब्लिसिटी जोरदार सुरू असल्याने पुढील काही दिवसांत कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसांत तब्बल 3.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘दशावतार’च्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. ‘कोकणातला कांतारा’ अशी त्याची चर्चा झाली होती. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. याचाच सकारात्मक परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाल्याचं पहायला मिळालं.
दशावतारची भारतातील कमाई-
पहिला दिवस- 50 लाख रुपये
दुसरा दिवस- 1.25 लाख रुपये
तिसरा दिवस- 2.00 लाख रुपये
एकूण कमाई- 3.75 कोटी रुपये
‘तुझ्यात जीव रंगला’, ‘ भागो मोहन प्यारे’, ‘माझा होशील ना’, सध्याची लोकप्रिय मालिका ‘कमळी’ अशा अनेक यशस्वी मालिका देणारे आणि ‘संदूक ‘, ‘हापूस’सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाच्या कथा – पटकथा लेखनाबरोबरच दिग्दर्शनाची प्रथमच स्वतंत्रपणे धुरा सांभाळली आहे. तर गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केलं आहे. 12 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ आहे. टीझर आणि ट्रेलरमधील कोकणातील भव्य निसर्ग दृश्ये, दशावतारी कलेशी संबंधित दृश्य आणि घनदाट अरण्य पाहून हा नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देणारा चित्रपट असेल याची खात्री पटते आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शकांनी केला आहे.