नवरात्रोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. नवरात्रीत अनेकजण देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठं आहेत. अनेकांची इच्छा असते ही नवरात्रीच्या दिवसांत या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्याची.
भाविकांसाठी आता एसटीने नवीन योजना आणली आहे. एसटीची शक्तिपीठ दर्शन सेवा 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कशी असेल ही सेवा आणि किती शुल्क असेल जाणून घेउयात सविस्तर बातमी.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांसाठी ही योजना आणली आहे. शक्तिपीठ दर्शनासाठी 27 सप्टेंबरपासून ही सेवा सुरू होणार आहे. यासाठी पुणे विभागातून विशेष बस सोडण्यात येणार आहेत. शिवाजीनगर, स्वारगेट आगारातून सकाळी 7 वाजता बस निघणार आहे. सध्या या सेवेसाठी 30 पेक्षा जास्त जणांनी बुकिंग केले आहे त्यामुळं प्रवासी वाढले तर बस सोडण्यात येणार आहेत.
कोणत्या मंदिरांचा समावेश असेल?
प्रवाशांना कोल्हापूर महालक्ष्मी, तुळजापूर (तुळजा भवानी), माहूर (रेणुका देवी), आणि नाशिक सप्तशृंगी मंदिराचे दर्शन करता येईल.
एसटीचे भाडे किती असेल?
पुरुषांचे प्रवासी भाडे 3101 आणि महिलांचे प्रवासी भाडे 1549 असे ठेवण्यात आले आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत दिली जाईल. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी अधिक भाविकांनी सेवा वापरण्याचे एसटीने आवाहन केले आहे.
कसा असेल प्रवास?
शिवाजीनगर येथून 27 सप्टेंबरला सकाळी सात वाजता बस निघेल. पहिल्या दिवशी कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन करुन तुळजापूरला मुक्काम असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माहूर (रेणुका देवी) दर्शन आणि मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी सप्तश्रृंगीचे दर्शन घेऊन पुण्याकडे परतीचा प्रवास असे नियोजन असणार आहे.
दरम्यान, बुकिंग एसटीच्या अधिकृत वेबसाइटवर (msrtc.maharashtra.gov.in) किंवा ऑनलाइन बुकिंग पोर्टलवर करता येईल. गट बुकिंगसाठी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. सध्या बुकिंग सुरू आहे आणि मागणी वाढल्यास अतिरिक्त बस उपलब्ध होतात. तसंच,प्रवास भाड्यात फक्त बस प्रवासाचा समावेश आहे. मंदिरांवरील दर्शन, निवास आणि जेवणाची व्यवस्था प्रवाशांना स्वतः करावी लागेल. एसटीकडून याबाबत कोणतीही जबाबदारी घेतली जाणार नाही.
FAQ
1. एसटी शक्तिपीठ दर्शन सेवा म्हणजे काय?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने नवरात्रोत्सव काळात भाविकांसाठी सुरू केलेली ही विशेष योजना आहे. यात साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी पुण्यातून विशेष बस सोडल्या जातील. ही सेवा सुरक्षित आणि सुखकर प्रवास सुनिश्चित करते.
2. ही सेवा कधी सुरू होणार आहे?
शक्तिपीठ दर्शन सेवा 27 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांसाठी ही योजना विशेषतः राबवली जाईल.
3. कोणत्या मंदिरांचा समावेश या सेवेत असेल?
या सेवेत कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरचे तुळजा भवानी मंदिर, माहूरचे रेणुका देवी मंदिर आणि नाशिकचे सप्तशृंगी मंदिर यांचा समावेश आहे. ही साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रातील प्रमुख देवीपीठे आहेत.