Saturday, September 20, 2025
Homeमहाराष्ट्रमान्सून परतीच्या प्रवासाला, पण पावसाचा धुमाकूळ कायम; आजही विजांसह पावसाची शक्यता

मान्सून परतीच्या प्रवासाला, पण पावसाचा धुमाकूळ कायम; आजही विजांसह पावसाची शक्यता

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारपासून पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तर मंगळवारपासून मॉन्सूनने राजस्थानच्या आणखी काही भागासह गुजरात, पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून माघार घेतली आहे.

 

मात्र, परतीच्या प्रवासाला लागल्यानंतरही महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ वाढला आहे. कोकण, विदर्भात पावसाचा मुक्काम सोमवार पर्यंत वाढला आहे.

 

भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. सर्वसाधारणपणे १७ सप्टेंबरला सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा तीन दिवस आधी, म्हणजेच १४ सप्टेंबरला पश्चिम राजस्थानमधून सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या नवीन प्रणालींमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी, महाराष्ट्रातून तो इतक्यात माघार घेणार नसून, आगामी आठवडाभर राज्यात पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे.

 

मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच गेल्या आठवड्यापासून राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. आजही, बुधवारी राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर उर्वरित राज्यात मात्र हलक्या पावसाची शक्यता आहे.

 

विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यातच राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उपराजधानी नागपुरात बुधवारी अवघ्या तीन तासात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाच्या हजेरीनंतरही काही ठिकाणी कमाल तापमान अद्यापही तिशीपार कायम आहे. अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

 

हेही वाचा “आम्ही चर्चेसाठी तयार, सरकारकडून प्रतिसाद हवा,” नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा शांतीप्रस्ताव…

 

राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत असून, बुधवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाची, तर रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरींची अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -