Saturday, September 20, 2025
Homeब्रेकिंगकुठे उभा राहतोय मनोज जरांगे पाटलांचा 100 फुटी पुतळा? सोशल मीडियावर रंगली...

कुठे उभा राहतोय मनोज जरांगे पाटलांचा 100 फुटी पुतळा? सोशल मीडियावर रंगली चर्चा

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गेलाय. मनोज जरांगे पाटील मराठा समाजात प्रचंड लोकप्रिय झालेत.जरांगे पाटील लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांचा 100 फुटी पुतळा उभारण्यात आल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागलीये.

 

मराठा आरक्षणाच्या जीआरच्या यशानंतर मराठवाड्यात मनोज जरांगे पाटलांचा असा भव्य पुतळा उभारला जात असल्याचा व्हिडिओ सोशल माडियावर वेगानं व्हायरल होऊ लागलाय. काही सोशल मिडिया साईट्सवर मनोज जरांगे पाटलांच्या पुतळ्याच्या फोटोंनी तर धुमाकूळ घातलाय. मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतल्या आझाद मैदानावरच्या उपोषणाच्या निमित्तानं आरपारची लढाई छेडली होती. या लढाईत त्यांना मोठं यश मिळालंय. सरकारनं हैदराबाद गॅझेटियरचा जीआर तातडीनं लागू केलाय. या जीआरमुळं कुणबी नोंदी असलेला लाखोंच्या संख्येतला मराठा समाजाचा ओबीसी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. या घडामोडींमुळं मनोज जरांगे पाटील मराठा समाजात प्रचंड लोकप्रिय झालेत. त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झालीये.त्यातच आता एका शहरातल्या चौकात अगदी मधोमध त्यांचा भव्य पुतळा उभारला जात असल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या व्हिडिओ आणि फोटोत जवळपास शंभर फुट उंचीचा भव्य पुतळा उभारला जात असल्याचं दिसतंय. या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं दिसतंय.

 

पुतळा उभारताना मनोज जरांगे पाटील साक्षात समोर उभे आहेत असं वाटावं एवढ्या बारकाव्यांचा विचार करण्यात आलाय. त्यांच्या गळ्यातील भगव्या रंगाचा कापडाचा गमछाही पुतळ्याच्या गळ्यात पाहायला मिळतोय. जरांगे पाटलांची केशरचना, त्यांची दाढी असे बारकावेही पुतळ्यात नेमके ठेवण्यात आलेत. या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर वा-याच्या वेगानं व्हायरल होऊ लागलेत. तरुणांमध्येही त्या पुतळ्याची जबरदस्त उत्सुकतेनं चर्चा होताना दिसली… आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर जरांगे यांचं नाव आझाद मैदानाला द्यावं अशी मागणीही पुढं आली होती.

 

मराठा समाजात जरांगेंचा प्रचंड फॅन फ़ॉलोईंग आहे. ज्या पद्धतीनं अल्पावधीत मोठं आंदोलन उभारलं गेलं. त्याच पद्धतीनं त्यांचा पुतळाही उभारला गेला असावा अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बातमी स्वरुपात माहिती देणा-या काही पोर्टलवरही अशा प्रकारचे फोटो पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटलांची कर्मभूमी मराठवाडा राहिलीय. शिवाय संभाजीनगर आणि जालना हे त्यांच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू राहिलेत. त्यामुळं झी २४ तासनं त्या फोटो व्हिडिओंची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चौकाचौकात जाऊन झी 24 तासच्या टीमनं पाहणी केली.

 

सोशल मीडियावरील त्या पुतळ्याच्या व्हिडिओबाबत थोडा रिसर्च करण्याचा निर्णय झी 24 तासनं घेतला. त्यात जे काही तथ्यं समोर आली होती अशी होती.

राज्यात कोणत्याही ठिकाणी असा पुतळा उभारला जात नाही. तो फोटो मराठवाड्यातील कोणत्याही शहरातला नाही. कोणत्याही महापालिका किंवा जिल्हा प्रशासनानं अशा पुतळ्याला परवानगी दिलेली नाही. संबंधित व्हिडिओ आणि फोटो AI जनरेटेड असल्याचा निष्कर्ष

 

पुतळ्याच्या परिसराचं बारकाईनं निरीक्षण केल्यास त्या फोटोत रिक्षा सायकल दिसतात. महाराष्ट्रात नागपूर वगळता अशी हातरिक्षा कुठंच चालवली जात नाही. पण नागपूरातही तसा पुतळा उभारला जात नसल्याचं आमच्या लक्षात आलं. तो फोटो व्यवस्थित पाहिला असता त्या परिसरात फेरिवाले आणि परिसराचं निरीक्षण केल्यास तो फोटो उत्तर भारतातल्या एखाद्या शहरातला असावा असं वाटतं. एकंदर फोटो तयार करणा-यानं हुशारी दाखवली असली तरी उत्तर भारतातला परिसर पुतळ्याभोवती उभा केल्यानं तो फोटोच एआय असल्यासारखा वाटतो.

 

मनोज जरांगे पाटलांची लोकप्रियता पाहता येत्या काळात त्यांचे पुतळे उभारले जातील यात शंकाच नाही. पण सध्या तरी महाराष्ट्रात जरांगे पाटलांचा कोणताही पुतळा उभारला जात नसल्याचं स्पष्ट झालंय. सोशल मीडियावर जे दिसतं, जे दाखवलं जातं ते तसंच असतं असं नाही. त्यामुळं असे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसल्यास त्यावर लगेचच विश्वास ठेऊ नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -