मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो.
ही योजना गोरगरिब महिलांसाठी एक मोठा आधार बनली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं जाणून घेऊयात….
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या लाडक्या बहिणी यांना केवळ 1500 रुपयांवर अवलंबून रहावे लागू नये, त्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन लाडक्या बहिणींना सक्षम करण्यात येईल. प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतसंस्था सुरु करुन जिल्हा बॅंकेमार्फत त्यांना 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन त्यांच्या पाठीशी शासन उभे राहील. अशाप्रकारे राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी होतील. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे, त्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरु करण्यात आले आहे. पंतप्रधानाच्या नेतृत्वात देशाने प्रगती केली असून 25 कोटी लोक गरिबी रेषेखालून वर आले आहेत. आज 15 कोटी लोकांना स्वतःचे घर उपलब्ध होऊ शकले. लोकांच्या जीवनात परिवर्तन आले, हे सगळे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात घडले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे उद्दिष्ट समोर ठेवले असून हा विकास महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नसल्याचे सांगून पंतप्रधानांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘बेटी बचाव’ पासून ‘लखपती दीदी’ पर्यंत अनेक योजना राबविल्या आहेत. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून राज्यात मागील वर्षी 25 लाख भगिनी लखपती बनल्या असून राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षीही तितक्याच महिला लखपती बनणार असून एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.