Saturday, September 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात विजांसह पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी

राज्यात विजांसह पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी

महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान विभागाने आज (ता. १९) १४ जिल्ह्यांसाठी विजांसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे सर्वाधिक ८० मिमी पावसाची नोंद झाली.

 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून कमाल तापमानात चढ-उतार दिसत आहेत. आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरित राज्यात उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता व्यक्त केली आहे.

 

 

मध्य बिहार व परिसरात समुद्रसपाटीपासून १.५ किमी उंचीवर, तर मराठवाड्यात १.५ ते ३.१ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच मध्य महाराष्ट्रापासून नैऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत आणि मध्य प्रदेशापासून बंगालच्या उपसागरापर्यंत दोन कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

 

राज्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. गुरुवारी (ता. १८) नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे राज्यातील उच्चांकी ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुसरीकडे, पावसाच्या हजेरीनंतरही काही भागात तापमान तिशीपार आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

 

 

हवामान विभागाने आज (ता. १९) नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, अमरावती, वर्धा, वाशीम, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास १४ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. १६ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून माघार घेतली होती. मात्र, गुरुवारी (ता. १८) मॉन्सूनच्या परतीत कोणताही बदल झाला नाही. सध्या भटिंडा, फतेहबाद, पिलानी, अजमेर, दिसा आणि भूज पर्यंत परतीची सीमा कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -