अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, मात्र या टॅरिफ धोरणाचा भारतापेक्षा त्यांनाच मोठा तोटा होत असल्याचं आता पुन्हा एकदा समोर आलं आहे. अमेरिकेला टॅरिफचा आणखी एका क्षेत्रामध्ये मोठा फटका बसल्याचं समोर आलं आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या भारयीयांची संख्या घटली आहे, गेल्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेमध्ये यंदा ऑगस्ट महिन्यात अमेरिकेत जाणाऱ्या पर्यटकांची संख्या 15 टक्क्यांनी घटली आहे. याबाबत अमेरिकेच्या नॅशनल ट्रॅव्हल आणि टुरिझम ऑफीस (NTTO) कडून माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेच्या नॅशनल ट्रॅव्हल आणि टुरिझम ऑफीसच्या आकडेवारीनुसार हा सलग तिसरा महिना आहे, ज्यात अमेरिकेमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या भारीय पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. जूनमध्ये पर्यटकांच्या संख्यात आठ टक्के घट झाली होती, जुलैमध्ये सहा टक्के तर ऑगस्टमध्ये तब्बल 15 टक्के पर्यटक कमी झाले आहेत. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिका आणि भारतामध्ये संबंध ताणले गेले आहेत, हे या मागचं मोठं कारण असू शकतं असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय पर्यटकांची संख्या कमी झाल्यानं या काळात अमेरिकेचं तब्बल 340 मिलियन डॉलरचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
यावर्षी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या घटली आहे, सरासरी दहा टक्के पर्यटक कमी झाले आहेत. 2024 मध्ये मोठ्या संख्येनं पर्यटकांनी अमेरिकेला भेट दिली होती, गेल्या वर्षी जून महिन्यात भारतीय पर्यटकांच्या संख्येत 35 टक्के वाढ झाली होती, जुलै महिन्यात 26 टक्के तर ऑगस्ट महिन्यात 9 टक्के पर्यटक वाढले होते, मात्र यंदा अमेरिकेला पर्यटन क्षेत्रात मोठा दणका बसला आहे, भारतीय पर्यटकांनी अमेरिकेकडे पाठ फिरवल्यामुळे याचा त्यांच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. प्रचंड नुकसान झालं आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे सध्या अमेरिकन पर्यटन व्यावसाय तोट्यात आहे. दरवर्षी मोठ्या संख्येनं भारतीय पर्यटक हे अमेरिकेला भेट देत असतात.