गँगस्टर मधल्या ‘या अली’ गाण्याचा गायक जुबिन गर्ग यांचं निधन झालं असून संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना गायक जुबिन गर्गचा बुडून अपघाती मृत्यू झाला. थ्रिल अनुभवण्यासाठी समुद्रात घेतलेली त्याची उडी शेवटची ठरली. जुबिन गर्गच्या अशा अकाली एग्झिटमुळे त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सिंगापूर पोलिसांनी गायकाला समुद्रातून रेस्क्यू केलं आणि तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तातडीनं जुबिन गर्गवर सर्वतोपरी उपचार करण्यात आले. पण, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. वयाच्या 52 व्या वर्षी जुबिन गर्ग यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘स्कूबा डायव्हिंग’ करताना जखमी, त्यातच घेतला अखेरचा श्वास
मीडिया रिपोर्टनुसार, ‘स्कूबा डायव्हिंग’ करताना जखमी झाल्यामुळे गायकाचा मृत्यू झाला. जुबिन गर्ग नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेला होता. जिथे तो 20 सप्टेंबर रोजी परफॉर्म करणार होता. त्याच्या मृत्यूच्या वृत्तानं त्याचे कुटुंबीय, आसामसह जगभरातल्या त्याच्या फॅन्सवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
1995 मध्ये मुंबईत आला अन् बॉलिवूडचा आवाज बनला
जुबिन गर्ग 1995 मध्ये मुंबईत आला. असंख्य लोकांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आलेल्या जुबिन गर्गनं आपला पहिला इंडीपॉप सिंगल अल्बम ‘चांदनी रात’ सुरू केलेला. त्यानंतर त्यानं काही हिंदी अल्बम आणि रीमिक्स गाणी रेकॉर्ड केली. ज्यामध्ये ‘चंदा’ (1996), ‘जलवा’ (1998), ‘यही कभी’ (1998), ‘जादू’ (1999), ‘स्पर्श’ (2000) यांसारख्या अल्बम्सचा समावेश होता. त्यानंतर त्यानं ‘गद्दार’ (1995), ‘दिल से’ (1998), ‘डोली सजा के रखना’ (1998), ‘फिजा’ (2000), ‘कांटे’ (2002) यांसारख्या फिल्म्समध्ये गाणी गायली.
जुबिनला खरी ओळख मिळाली ‘गँगस्टर’ मधल्या ‘या अली’ गाण्यामुळे
जुबिन गर्गला बॉलिवूडमध्ये सर्वात मोठा ब्रेक मिळाला ‘गँगस्टर’ चित्रपटातून. या सिनेमासाठी त्यानं ‘या अली’ हे गाणं गायलं. जुबिनने आसामी, हिंदी, बंगाली, कन्नड, उडिया, तमिळ, तेलुगू, पंजाबी, नेपाळी, मराठी आणि मल्याळम चित्रपटांसाठीही गाणी गायली. त्याचा जन्म आसाममधील जोरहाट इथे झाला. जुबिन गर्ग हा आसाम आणि पश्चिम बंगालमधील एक रॉकस्टार म्हणून नावारुपाला आलेला.
तीन वर्षांपूर्वी, जुबिन बाथरूममध्ये पडलेला…
यापूर्वी, 2022 मध्ये, जुबिन त्याच्या हॉटेलच्या खोलीत बाथरूममध्ये पडला होता, ज्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. झुबिन गर्ग त्यावेळी आसाममध्ये होता आणि त्याला ताबडतोब दिब्रुगडमधील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्याला विमानाने हलवण्यात आलं. सीटी स्कॅनमध्ये असं दिसून आलेलं की, त्याला फिट आल्यामुळे तो चक्कर येऊन जागीच कोसळला.