वाशिम (Washim) जिल्ह्यातील रिसोड शहरात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या नावाखाली दागिने, रोख रोकड लंपास करणारी टोळीला जेरबंद करण्यात यश आलं आहे. वाशिमच्या रिसोड शहरात लग्नाच्या पहिल्याच दिवशी सहकाऱ्यांच्या मदतीने नववधूने दागिने, रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला. पण रिसोड पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे. या प्रकरणी तीन महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
ही टोळी आधी श्रीमंत मुलांकडे मुलगी दाखवत असे आणि पारंपरिक पद्धतीने लग्न लावून देत असे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातील पैसे आणि दागिने घेऊन फरार होत असे. अशा पद्धतीने महाराष्ट्र सह मध्यप्रदेशात राजस्थान भागात अनेक कुटुंबांची फसवणूक करण्यात ही टोळी सक्रिय होती.पोलिसांनी या टोळीला जेरबंद करत 40 हजार रुपयांचे दागिने आणि तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी रिसोड पोलीस अधिकचा तपास करत असून या प्रकरणात आणखी काही आरोपींसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.




