पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 सप्टेंबर रोजी देशाला संबोधित करून 22 सप्टेंबरपासून जीएसटीचे नवे दर लागू होतील, अशी घोषणा केली. याआधी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला जीएसटी परिषदेची बैठक पार पडली होती. या बैठकीत जीएसटीचे दोनच स्लॅमब असतील असे ठरवण्यात आले होते. या घोषणेनंतर आता अनेक वस्तू स्वस्त होणार असून त्याचा सामान्यांना फायदा होणार असल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, आता 22 सप्टेंबर रोजीपासून जीएसटीचा नवे स्लॅब लागू झाल्यामुळे इतर वस्तूंप्रमाणेच मद्य स्वस्त होणार का? असे विचारले जात आहे.
नेमका काय फायदा होणार?
आता बदललेल्या नियमांनुसार देशात फक्त दोनच स्तरांत जीएसटी आकारला जाईल. या निर्णयामुळे एकूण 375 वेगवेगळ्या उत्पादनांवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील सामान्यांसाठी अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत, असे सरकारकडून सांगितले जात आहे. नव्या नियमानुसार आता आता 5 आणि 18 असो दोनच करटप्पे लागू असतील. या निर्णयामुळे अगोदर 12 टक्क्यांच्या करटप्प्यात येणाऱ्या 99 टक्के वस्तू या 5 टक्क्यांच्या करश्रेणीत आल्या आहेत. तसेच 28 टक्के करश्रेणीत येणाऱ्या साधारण 90 टक्के वस्तू 18 टक्के करश्रेणीत आल्या असून याचा लोकांना चांगला फायदा होणार आहे. दुसरीकडे सरकारने 40 टक्के कर आकारणारी एक विशेष करश्रेणी आणली आहेत. यामध्ये तंबाखू, सिगारेट, आलिशान कार अशा वस्तूंचा समावेश आहे.
पेट्रोल डिझेल महागणार का?
दरम्यान, आता सरकार अनेक वस्तू स्वस्त होणार असल्याचे सांगत असल्यामुळे मद्य म्हणजेच दारूदेखील स्वस्त होणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. यासह पेट्रोल, डिझेल हेदेखील स्वस्त होणार का? असे सामान्य नागरिक विचारत होते. मात्र मद्य आणि पेट्रोल, डिझेल यांच्या किमतीवर कोणताही परिणाम पडणार नाही. कारण पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र तसेच राज्य सरकारकडून वेगवेगळी करआकारणी केली जाते.
मद्य स्वस्त होणार का?
वर उल्लेख केल्याप्रमाणे देशातील मद्याच्या किमतीवरही या निर्णयाचा परिणाम पडणार नाही. कारण मद्यावर करआकारणी करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. राज्य सरकार मद्यावर व्हॅट आकारतात. देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या तिजोरीत मद्यावर लावलेल्या कराच्या माध्यमातून मोठी भर पडते. मद्य केंद्र सरकारच्या जीएसटीमध्ये येत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने लागू केलेल्या या नव्या जीएसटीमुळे मद्य महागणार किंवा स्वस्तही होणार नाही.




