करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात विधिवत घटस्थापना करून सोमवारी शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. पहाटे घंटानाद झाल्यानंतर मंत्रोच्चारात घट बसवण्यात आला. प्रथेनुसार तोफेची सलामी दिल्यानंतर विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते देवीची शासकीय पूजा करण्यात आली. दरम्यान, नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी 1 लाख 25 हजार 417 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
पहिल्या दिवशी सोमवारी अंबाबाईची कमलादेवी रूपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक बाबुराव ठाणेकर, प्रसाद लाटकर व योगेश जोशी यांनी ही पूजा बांधली. विविध फुले व पानांपासून अंबाबाई मंदिराची सजावट, विद्युत रोषणाईने मंदिर आवार उजळून गेला आहे. तसेच, घरोघरी घटस्थापनेचा विधी करण्यात आला.
कलश आकारातील पालखीची मिरवणूक
कोल्हापूर : सोमवारी रात्री साडेनऊ वाजता कलशाच्या आकारात फुलांनी सजवलेली पालखी पारंपरिक लवाजम्यासह गरुड मंडपातून बाहेर पडली. यावेळी हजारो भाविकांनी पालखीतील उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. ‘उदं गं अंबे उदं…’च्या गजरात सारा मंदिर आवार दुमदुमला. पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली. नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. मानाच्या भाविणींनी देवीची गीते सादर केली. जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ-मृदंगांचा ताल, अंबेचा अखंड गजर अशा मंगलमय वातावरणात अंबाबाईच्या पालखी सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
घरोघरी घटस्थापना उत्साहात
घरोघरी सोमवारी सकाळी घटस्थापना करण्यात आली. झेंडूच्या फुलांच्या माळा, आंब्याची पाने यांनी दरवाजाला तोरणे सजवण्यात आली. घटस्थापनेनंतर विड्याच्या पानांवर देव बसवण्यात आले. आरती करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला.




