छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. नुकताच बिग बॉसचे मल्याळम भाषेतील सातवे सिझन सुरु आहे. या शोची जगभरात चर्चा सुरु आहे. कारण यावेळी एक लेस्बियन कपल या शोमध्ये पहायला मिळाले होते. त्यावरुन बराच वादही झाला होता. आता या कपलने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी जगासमोर प्रेमाची कबूली देऊन साखरपुडा केला आहे.
नूरा आणि अधीला हे लेस्बियन कपल बिग बॉस मल्याळम ७मध्ये सहभागी झाले आहे. जगाला न घाबरता या कपलने शोमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाने सर्वांची मने जिंकली. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की टेलिव्हीजनसमोर या लेस्बियन कपलने प्रेमाची कबुली देत साखरपुडा केला. दोघींनीही एकमेकींना आंगठ्या घातल्या आहेत.
मोहनलाल यांनी व्यक्त केला आनंद
बिग बॉस मल्याळम सिझन सातचे सूत्रसंचालन मोहनलाल हे करत आहेत. त्यांनी या लेस्बियन कपलचे कौतुक केले आहे. कारण, घरातच नूरा आणि अधीला यांनी साखरपुडा केला आहे आणि एकमेकींना अंगठ्या घातल्या. या लेस्बियन जोडप्याला असे करताना पाहून शोचे होस्ट मोहनलाल खूप आनंदी झाले आणि त्यांनी दोघींना शुभेच्छाही दिल्या. जेव्हा अधीला आणि नूरा यांनी शोमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा या जोडप्याने खूप प्रसिद्धी मिळवली होती.
झाला होता वाद
बिग बॉसचा सातवा सिझन जेव्हा सुरु झाला तेव्हा लेस्बियन कपल पाहून अनेकांनी टीका केली. समाजातील मुलींमध्ये चुकीचा संदेश जातो असे अनेकांचे म्हणणे होते. पण या कपलने कोणालाही न घाबरता आपला खेळ सुरु ठेवला आहे आणि बिग बॉसच्या घरात खासगी आयुष्यातील मोठा निर्णय घेतला आहे.




