दिल्लीतील एका नामांकित आश्रमात सुरू असलेल्या गैरकृत्यांचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आश्रमाची काळी बाजू समोर येताच, तिथे शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी होणाऱ्या गलिच्छ प्रकारांचे गुपित पोलिसांसमोर उघड केले.
यानंतर, हा आश्रम चालवणारा स्वामी चैतन्यानंद तात्काळ तिथून फरार झाला आहे. वसंत कुंज येथील एका पॉश परिसरातील या प्रसिद्ध आश्रमात मॅनेजमेंट कोर्सची (Management Course) शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी संचालक चैतन्यानंदवर छेडछाडीचे आरोप लावले आहेत. श्री शृंगेरी मठ आणि त्याच्या मालमत्तांचे प्रशासक पी.ए. मुरली यांच्या तक्रारीवरून स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अनेक कलमांनुसार लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Delhi Ashram Crime News)
या आश्रमात दोन तुकड्या (batches) सुरू आहेत, ज्यात एकूण ३५ हून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १७ विद्यार्थिनींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात आश्रम संचालक चैतन्यानंद सरस्वतीने त्यांच्यासोबत छेडछाड केल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, संस्थेकडून मिळालेली हार्ड डिस्कही एफएसएल तपासणीसाठी पाठवली आहे. त्याचबरोबर १६ पीडित विद्यार्थिनींचे जबाब न्यायालयात (पटियाला हाऊस कोर्ट) नोंदवण्यात आले आहेत.
या प्रकरणावर दक्षिणामन्या श्री शारदा पीठम्, शृंगेरी आश्रमाने (Sharada Pitham Shrungeri Ashram) एक निवेदन जारी करून या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. “स्वामी चैतन्यानंद सरस्वती बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेला होता. पीठने त्याच्याविरुद्ध तक्रारही दाखल केली आहे. त्याचे आचरण आणि कामे बेकायदेशीर, चुकीची आणि पीठच्या हिताविरुद्ध होती. यामुळेच त्याच्याशी पीठचे सर्व संबंध संपुष्टात आणले आहेत. स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या बेकायदेशीर कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे,” असे आश्रमाने म्हटले आहे.
‘श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट-रिसर्च’ (वसंत कुंज, नवी दिल्ली) हे एआयसीटीई (AICTE) मान्यताप्राप्त असून, ही संस्था पीठच्या अंतर्गत चालवली जाते. या संस्थेचे कामकाज पीठद्वारे स्थापन करण्यात आलेल्या गव्हर्निंग कौन्सिलकडून चालवले जाते, ज्याचे अध्यक्ष प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ. कृष्णा वेंकटेश आहेत. गव्हर्निंग कौन्सिलने आश्वासन दिले आहे की, विद्यार्थ्यांच्या हिताची पूर्ण सुरक्षा केली जाईल आणि त्यांच्या शिक्षण किंवा कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.
बळजबरीने अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न
४ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असा आरोप आहे की, स्वामी चैतन्यानंदने (Swami Chaityanand) ईडब्ल्यूएस शिष्यवृत्तीवर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (PGDM) कोर्स करत असलेल्या विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केले. आतापर्यंत ३२ विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, ज्यापैकी १७ जणींनी सांगितले की आरोपी स्वामीने त्यांच्यासोबत अश्लील भाषेचा वापर केला, आक्षेपार्ह मेसेज पाठवले आणि बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडितांचा असाही आरोप आहे की, संस्थेतील काही महिला कर्मचारी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनीही स्वामीला साथ दिली आणि विद्यार्थिनींवर त्याच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव आणला.
वॉर्डनची साथ
विद्यार्थिनींचा आरोप आहे की, आश्रमात काम करणाऱ्या काही वॉर्डन त्यांना आरोपीला भेटण्यासाठी बोलवत होत्या. सर्व पीडित विद्यार्थिनींचे जबाब न्यायालयात १६४ CrPC कलमांतर्गत नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे. आरोपीच्या शोधात पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत, पण अद्याप त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.
संचालकाच्या गाडीवर बनावट नंबर
पोलीस तपासामध्ये असेही समोर आले आहे की, आरोपी आपल्या महागड्या ‘व्होल्वो’ गाडीवर दूतावास किंवा संयुक्त राष्ट्र (UN) ची बनावट नंबर प्लेट लावून फिरत होता. चैतन्यानंदने आपल्या ‘व्होल्वो’ गाडीवर “39 UN 1” असे लिहिले होते. पोलिसांनी या नंबरची चौकशी करून संयुक्त राष्ट्राकडून (UN) अहवाल मागवला, तेव्हा असा कोणताही नंबर जारी केला नसल्याचे समोर आले. आरोपीने स्वतःच गाडीवर हा बनावट नंबर लिहिला होता. सध्या पोलिसांनी ही गाडी जप्त केली असून, आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
