महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यात अतिमुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. बळीराजा हवालदिल झाला असून, आता पुढे काय करायचं असा प्रश्न त्याच्यापुढे आहे.
पावसाचा सर्वाधिक फटका यंदा मराठवाड्याला बसला आहे, प्रचंड पावसामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढला पडला असून, गावांचा सर्पंक तुटला आहे. घरात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. संसारोपयोगी वस्तू पाण्याबरोबर वाहून गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पाळीव जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. शेताची अवस्था तर याहून बिकट आहे. शेतांमध्ये पाणी साचलं आहे, उभी पीक आडवी झाली आहेत. लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी औसा तालुक्यात जाऊन नुकसानाची पहाणी केली आहे. शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी चर्चा केली, नुकसानाचा आढावा घेतला आहे. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री यांनी म्हटलं की, मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला आहे. बीड, लातूर आणि धाराशिवमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शासन म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही सर्व निकष बाजूनला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत कणार आहोत.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ड्रोनचा पंचनामा असला तर आम्ही मान्य करू, मोबाईलवर फोटो असला तरी नुकसानीचा पंचनामा मान्य होणार असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले टंचाई म्हणजे दुष्काळ, त्यामुळे टंचाईच्या काळात ज्या-ज्या उपाय योजना लागू केल्या जातात त्या -त्या सर्व उपाय योजना आम्ही लागू करणार आहोत, आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाहीत. दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पिकांच्या नुकसानाचा आढावा घेतला आहे.




