Monday, November 24, 2025
Homeब्रेकिंगMPSC पूर्व परीक्षा पुढे ढकला, सध्या विद्यार्थ्यांची मानसिकता नाही; जयंत पाटलांची सरकारकडे...

MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकला, सध्या विद्यार्थ्यांची मानसिकता नाही; जयंत पाटलांची सरकारकडे मोठी मागणी

राज्यातील अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात असून बळीराजाची पुण्यात, मुंबईत (Mumbai) असलेली लेकरंही व्याकुळ झाली आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी पोरं, पोरी आपल्या आई-बापांचे होणारे हाल, आपल्या शेवारात पसरलेल्या पाण्याचे व्हिडिओ पाहून हवालदिल झाले आहेत. अर्थातच, एमपीएससीची परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, या गावाकडील संकटांचं ओझं घेऊन परीक्षेला बसावं लागणार आहे. मात्र, आता एमपीएससीची (MPSC) ही परीक्षा (Exam) पुढे ढकलावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांनी केली आहे. येत्या 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही, असे पाटील यांनी म्हटलं.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून येत्या रविवारी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही. त्यामुळे, आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा व मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थितीत आहेत. अशा वेळी त्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे ही मोठी समस्या ठरते. नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना जर परीक्षा देता आली नाही, तर ते अत्यंत अन्यायकारक ठरेल. परीक्षेत समान संधी मिळावी ही प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा आहे.

 

पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही. तयारी असूनही अशा बिकट परिस्थितीत बसून परीक्षा देणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

सिमेंटच्या

रस्त्यामुळेच पुराचे संकट (Jayant patil on flood)

दरम्यान, जयंत पाटील यांनी आज पूरग्रस्त भागाचा दौरा करताना माढा तालुक्यातील पूरग्रस्त शेतांची पाहणी केली. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधताना सरकारकडे अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली आहे. तसेच रस्ते करताना चुकीच्या पद्धतीने होत असून सध्याचे रस्ते हे सिमेंटचे असल्याने यात पाणी मुरत नाही. याशिवाय ज्या पद्धतीचे रस्ते डिझाईन केले जात आहेत ते बांधाचे काम करीत असल्याने इकडचे पाणी तिकडे जात नाही आणि त्यामुळेच पुराचा फटका बसतो, असे रस्ते 100 पेक्षा जास्त ठिकाणी असल्याचे आपल्याला माहित आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

 

दरम्यान, पूरग्रस्त पाहणीच्या दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी बाधित शेतकरी पूर्ण ग्रासलेला आहे, जीवनाला कंटाळलेला आहे, अशा अवस्थेत त्याच्या तोंडून एखादा चुकीचा शब्द जरी गेला तरी तो आपण समजून घेतला पाहिजे, असा सबुरीचा सल्ला जयंत पाटील यांनी सत्ताधारी मंत्र्‍यांना दिला. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन पाटील यांनी हा सल्ला दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -