आशिया कप 2025 च्या फायनल आधी पाकिस्तानचे दोन खेळाडू साहिबजादा फरहान आणि हारिस रौफ या दोघांना झटका बसू शकतो. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या तक्रारीवरुन ICC या प्रकरणात सुनावणी करत आहे. या दरम्यान पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने तक्रार करुन काही फायदा झाला नाही. ICC ने टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला इशारा देऊन सोडून दिलं. मॅच रेफरीने सूर्यकुमार यादवला काही सल्ले सुद्धा दिले.
पाकिस्तान विरुद्ध 14 सप्टेंबरच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पीडितांबद्दल संवेदना व्यक्त केलेली. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैन्य दलांना विजय समर्पित केलेला. त्यावेळी सूर्यकुमार यादवने एक मोठ वक्तव्य केलेलं. त्यावर PCB ने आक्षेप घेत ICC कडे तक्रार केलेली. या प्रकरणी 25 सप्टेंबरला सुनावणी झाली.
PTI रिपोर्ट्सनुसार, कॅप्टन सूर्यकुमार यादव BCCI चे सीओओ हेमांग अमीन आणि क्रिकेट ऑपरेशन मॅनेजर समर मल्लापुरकर यांच्यासह मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर हजर झाले. भारतीय कॅप्टन सूर्याने गुन्हा मान्य केला नाही. त्याने तर्क दिला की, त्याचं वक्तव्य राजकारणापासून प्रेरित नव्हतं.
ICC ने काय निर्णय दिला?
रिपोर्ट्सनुसार रिचर्डसन यांनी सूर्यकुमार यादवला जी राजकीय वाटतील, अशी वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला. ICC आचार संहितेतंर्गत लेवल 1 गुन्हा सामान्यपणे इशारा किंवा मॅच फी च्या 15 टक्के दंड असतो. सध्या सूर्याला फक्त इशारा देऊन सोडण्यात आलं.
आता रौफ आणि फरहानची आली वेळ
दरम्यान बीसीसीआयने सुद्धा दोन पाकिस्तानी खेळाडू हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्या तक्रारी केल्या आहेत. त्याची सुनावणी 26 सप्टेंबरला होईल. या सुनावणीत दोन्ही खेळाडू दोषी आढळले तर त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. असं झाल्यास 28 सप्टेंबरला होणाऱ्या फायनलआधी पाकिस्तानला मोठा झटका बसू शकतो.

