आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्याचं काउंटडाऊन सुरु झाल आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी 28 सप्टेंबरला महाअंतिम सामना होणार आहे. हा सामना दुबईमध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.
टीम इंडियाने या स्पर्धेतील आपले सर्व आणि सलग 6 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला साखळी आणि सुपर 4 फेरीतील 6 पैकी एकूण 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. टीम इंडियानेच पाकिस्तानला या दोन्ही सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत अंतिम फेरीनिमित्ताने दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध एकूण तिसरा विजय मिळवून आशिया चॅम्पियन होणार की पाकिस्तान पहिल्या 2 पराभवांची परतफेड करणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.
टीम इंडिया आशिया कप गतविजेता आहे. तसेच टीम इंडिया यंदाही आशिया कप जिंकेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. मात्र क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. मात्र या सामन्यात पावसाची एन्ट्री झाली तर? तसेच इतर काही कारणांमुळे सामना होऊ शकला नाही तर कोणता संघ विजेता ठरणार? हे जाणून घेऊयात.
दुबईत 28 सप्टेंबरला सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सामन्यात पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र इतर कारणामुळेही व्यत्यय आल्यास सामना रद्द केला जाणार नाही.
29 सप्टेंबर राखीव दिवस
महत्त्वाच्या स्पर्धेत बाद फेरीतील आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद केलेली असते. सामना निकाली निघावा यासाठी राखीव दिवस ठेवला जातो. त्यानुसार आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठीही 29 सप्टेंबर हा दिवस राखीव आहे. त्यामुळे रविवारी व्यत्यय आल्यास राखीव दिवशी सामना होईल. राखीव दिवशीही काही कारणामुळे सामना होऊ न शकल्यास दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता जाहीर करण्यात येईल.
अभिषेक शर्माच्या कामगिरीकडे लक्ष
दरम्यान या महाअंतिम सामन्यात टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांच लक्ष असणार आहे. अभिषेकने टीम इंडियाच्या सुपर 4 मधील सलग तिन्ही सामन्यात अर्धशतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. अभिषेकने पाकिस्तान, बांगलादेशनंतर श्रीलंकेविरुद्ध अर्धशतकी खेळ केली. त्यामुळे आता अभिषेक सलग चौथं आणि पाकिस्तान विरुद्ध दुसरं अर्धशतक ठोकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.




