शासकीय योजनेतून पैसे मिळवून देतो, असे आमिष दाखवून ९ लाख ६३ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी तिघाविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. युवराज तेली, अभिषेक पाटील व अनिकेत पाटील (तिघेही रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्यादी दुर्गा आळतेकर (रा. साखरवाडी, कोडोली) यांनी दिली.
युवराज तेली याने दुर्गा आळतेकर यांच्या ओळखीचा फायदा घेत शासकीय योजनेतून प्रत्येक महिन्याला १००० रुपये मिळवून देतो असे सांगून त्यांच्या नावाने बँकेत नवीन खाते काढूनबँकेतून एटीएम कार्ड लगेच घेतले व नवीन सिमकार्ड खरेदी केले. काम पूर्ण झाल्यावर एटीएम कार्ड व सिमकार्ड परत देतो असे सांगून आरोपींनी ते स्वतः जवळ ठेवून घेतले. काही दिवसानी आरोपींनी आळतेकर यांच्या घरी जाऊन शासकीय योजनेचे पैसे मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते असे सांगत फोटो घेतला. त्यानंतर खाते उघडल्याचे सांगून योजनेतील २५०० रुपये आल्याचे सांगून त्यांना ही रक्कम देवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी सिमकार्ड व एटीएमचा वापर करून गैरमार्गाने ९ लाख ६३ हजार ३२९ रुपयांचा व्यवहार करून आळतेकर व इतर लोकांचा विश्वास संपादन करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे




