तामिळनाडूतील करूर येथे 27 सप्टेंबर रोजी झालेल्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ च्या राजकीय रॅलीतील चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 41 वर पोहोचली आहे.करूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय सुगुणा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली, तर अभिनेता विजय थलपती यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली.
एकूण 41 मृतांमध्ये 18 महिला आणि 10 मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आणि टीव्हीके प्रमुख विजय यांच्याशी फोनवरून संवाद साधला. राहुल गांधींनी स्टालिन यांच्याकडे घटनेची माहिती घेऊन जखमींच्या उपचाराबद्दल विचारणा केली. स्टालिन यांनी ‘एक्स’वर गांधींचे आभार मानले. तसेच, गांधींनी टीव्हीके प्रमुख विजय यांनाही फोन करून कार्यकर्त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
या दुर्घटनेत 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. विजय यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. टीव्हीकेने या घटनेची सीबीआय किंवा स्वतंत्र चौकशी व्हावी यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. करूर पोलिसांनी पदाधिकार्यांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून, फॉरेन्सिक पथकांनी तपास सुरू केला आहे.
