यंदाच्या आशिया चषकावर भारताने आपले नाव कोरले. पाकिस्तानला पाच गडी राखून नमवल्यानंतर भारतीय संघाला नियमाप्रमाणे आशिया चषक मिळणे अभिप्रेत होते. मात्र आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे प्रमुख तसेच पाकिस्तानमध्ये मंत्री असलेले मोहसीन नक्वी जेतेपदाची ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन गेले. नक्वी यांच्या या कृतीनंतर आता क्रिकेट जगतात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आशिया चषक तसेच इतर पदकंदेखील नक्वी त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये घेऊन गेले आहेत. दरम्यान आता ते भारताला ट्रॉफी परत देण्यास तयार आहेत, मात्र त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. या अटीमुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
नक्वी यांनी नेमकी काय अट ठेवली आहे?
क्रिकबझ या क्रिकेटविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार मोहसीन नक्वी यांनी आशिया चषक भारताला परत देण्याची तयारी दाखवली आहे. भारताला ट्रॉफी तसेच इतर मेडल्सदेखील मी परत देतो, असं नक्वी यांनी म्हटलंय. मात्र त्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच या कार्यक्रमात मी स्वत: ही ट्रॉफी आणि मेडल्स भारताला देईल, अशी अट त्यांनी ठेवली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. त्यामुळे नक्वी यांची ही अट मान्य होण्याची शक्यता फारच कमी आहे. असे असताना आता नक्वी यांच्या अटीनंतर भारत नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मैदानावर काय घडलं होतं?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताचा विजय झाला. आमचा विजय झाला तर आम्ही नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, अशी भूमिका भारतीय संघाने घेतली होती. दुसरीकडे नक्वी मात्र एसीसीचा प्रमुख या नात्याने मीच ट्रॉफी देणार, असा मोहसीन नक्वी यांनी हट्ट धरला होता. भारतीय संघानेही माघार घेतली नाही. त्यामुळे साधारण सव्वा तास नक्वी मंचावर उभे होते. त्यानंतर भारतीय संघ ट्रॉफी घ्यायला येत नसल्याचे लक्षात येताच ते आशिया चषक घेऊन गेले. सोतबच इतर मेडल्सदेखील ते घेऊन गेले.
नक्वी यांनी ठेवलेल्या अटीचे नेमके काय होणार?
दरम्यान, नक्वी यांच्या या कृत्यानंतर बीसीसीआयने मात्र कठोर भूमिका घेतली आहे. आम्ही आयसीसीकडे याबाबत तक्रार करणार आहोत, असे बीसीसीआयने म्हटलेले आहे. नक्वी यांना मेडल आणि ट्रॉफी घेऊन जाण्याचा काहीही अधिकार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. दरम्यान आता नक्वी यांनी ठेवलेल्या अटीचे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
