सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस 19’ या शोमधून कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएन्सर आवेज दरबार अचानक बाहेर पडला. ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये त्याची वहिनी आणि अभिनेत्री गौहर खानला बोलावण्यात आलं होतं. गौहरने तिच्या दीराला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु इतकं सगळं होऊनही आवेजला शोमधून जावं लागल्याने प्रेक्षक चकीत झाले. त्याच्या एलिमिनेशनबद्दल आता नवी माहिती समोर येत आहे. आवेज कमी मतं मिळाल्याने बेघर झाला नसून त्याच्या कुटुंबीयांनीच त्याला बाहेर काढायला लावल्याचं कळतंय. यासाठी त्यांनी निर्मात्यांना काही रक्कमसुद्धा दिल्याचं समजतंय. यामागचं मोठं कारण म्हणजे आवेजची एक्स गर्लफ्रेंड शुभी जोशी.
‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉसचे निर्माते आवेज दरबारची एक्स गर्लफ्रेंड शुभी जोशीला वाइल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे घरात आणण्याचा विचार करत आहेत. अमाल मलिक आणि बसीर अली यांनी आवेजवर रिलेशनशिपबद्दलचे अनेक आरोप केले होते. त्यावरून शोमध्ये बराच ड्रामा झाला होता. बिग बॉसच्या घराबाहेर आवेज बऱ्याच मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला.
शोमधील एका टास्कदरम्यान जेव्हा बिग बॉसने अमाल आणि बसीर यांच्यातील चर्चेची क्लिप दाखवली, तेव्हा चांगलाच हंगामा झाला होता. ती क्लिप पाहून आवेज ढसाढसा रडला होता. त्याने स्पष्ट केलं की या शोमध्ये येण्याआधी तो नगमा मिराजकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्याने कोणालाही फसवलं नाही. या संपूर्ण ड्रामानंतर आवेजच्या कुटुंबीयांनी त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. शोच्या नियमांनुसार जर एखादा स्पर्धक काही कारणास्तव स्वत:हून बाहेर पडत असेल तर त्याला निर्मात्यांना भरपाई द्यावी लागते. त्यानुसार आवेजच्या कुटुंबीयांनी बिग बॉसला पैसे देऊन त्याला शोमधून बाहेर काढल्याचं समजतंय.
शुभीने एका मुलाखतीत आवेजसोबतच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. त्यावरून आवेजने नगमाची फसवणूक केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आवेज हा प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. अभिनेत्री गौहर खानने त्याचा भाऊ झैद दरबारशी लग्न केलंय. आवेजच्या खासगी आयुष्याचा टेलिव्हिजनवर तमाशा होऊ नये, म्हणून त्यांनी त्याला तिथून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.







