हवामान बदलाचे फटके आता बसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या समुद्रातील इमेल्डा या वादळाची जगभरात चर्चा आहे. हे वादळ बरमुडा बेटाकडे सरकत आहे. त्यामुळेच हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी तेथील लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बरुमुडा बेटावर या वादळाचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. इथे सकाळपासूनच जोराचा वारा सुटला असून जोरदार पाऊस बरसत आहे.अमेरिकेतील मियामी येथे वादळाविषयी अभ्यास करणारे एक केंद्र आहे. या केंद्राने दिलेल्या माहितीनुसार इमेल्डा या वादळाचा कमाल वेग 150 किमी प्रतितास आहे.
सध्या हे वादळ 21 किमी प्रतितास वेगान अमेरिकेच्या पूर्व-उत्तर दिेशेने सरकत आहे. या वादळाचा बरमुडालाही धोका निर्माण झाला आहे. या वादळामुळे तुफान वारा, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच बरमुडा येथे बुधवारी सर्व शाळा, विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या वादळाचा वेग लक्षात घेता नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




