Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात यंदा पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार? एकनाथ शिंदेंच्या...

राज्यात यंदा पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार? एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडेही लक्ष

राज्यात आज विजयदशमीचा (Dasara) उत्साह आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज दसरा मेळावा घेणार आहे. तर यंदा बंजारा समाजाकडूनही दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यात येणार आहे.

 

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा- (Uddhav Thackeray Dasara Melava)

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. य़ावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे.. दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का ? यासंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय.

 

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा-

(Eknath Shinde Dasara Melava)

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी 6 वाजता असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही, अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे. या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी मेळाव्याचं ठिकाणी आझाद मैदान ठरलेलं मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने ठिकाण बदलण्यात आलं.

 

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा- (Pankaja Munde Dasara Melava)

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा बीडच्या सावरगाव घाट येथे होणार आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सीमोल्लंघन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय या ठिकाणी दाखल होतो. पंकजा मुंडेंचे मार्गदर्शनपर भाषण ऐकण्यासाठी जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त -मुंडे समर्थक मोठ्या संख्येने भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात. मंत्री पंकजा मुंडे मुंबईहून हेलिकॉप्टरने सकाळी 11 वाजता सावरगाव घाट येथे दाखल होतील. त्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन त्या दर्शन घेतील. आणि भगवान बाबा यांच्या मूर्तीची पूजा आणि आरती करतील. साधारण 12 वाजता पंकजा मुंडे संबोधित करतील. धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाकेही पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत.

 

मनोज जरांगेंचा दसरा मेळावा- (Manoj Jarange Dasara Melava)

नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा आज दसरा मेळावा होणार आहे, मनोज जरांगे रुग्णालयात असल्याने ॲम्बुलन्सने नारायण गडाकडे रवाना होतील. सकाळी दहा वाजेपर्यंत नारायण गडाच्या पायथ्याशी जरांगे पाटील दाखल होतील. गडावर दर्शन घेतल्यानंतर महंत शिवाजी महाराजांसोबत जरांगे पाटील मुख्य व्यासपीठावर पोहचतील.

 

पोहरादेवी येथे बंजारा समाजाचा दसरा मेळावा-

(Banjara Samaj Dasara Melava)

आज दुपारी 2 वाजता बंजारा समाजाचा दसरा मेळावा होणार आहे. बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण लागू करण्यात यावे यासाठी राज्यात ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले जात आहे. आरक्षणाच्या संदर्भात पुढील रणनीती या दसरा मेळाव्यात पहायला मिळणार आहे. राज्यातील लोकप्रतिनिधीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. त्यामुळे पोहरागडावरील दसरा मेळावा देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -