टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघेही टी 20I आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता लवकरच वनडे क्रिकेटच्या माध्यमातून ऑन फिल्ड दिसणार आहेत. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआय या दौऱ्यासाठी शनिवारी 4 ऑक्टोबरला भारतीय संघाची घोषणा करु शकते. बीसीसीआय निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱ्यानिमित्ताने भारतीय एकदिवसीय संघाबाबत मोठा बदल करु शकते, असं म्हटलं जात आहे. बीसीसीआयचा नक्की संभाव्य गेम प्लान काय आहे? जाणून घेऊयात.
रोहितच्या नेतृत्वाबाबत फैसला!
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमधून टीम इंडियाचा कॅप्टन बदलणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता निवड समिती रोहितच्या नेतृत्वाबाबत शनिवारी काय निर्णय घेणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया सध्या मायदेशात विंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20I सामन्यांची मालिका खेळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी 4 ऑक्टोबरला भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. रोहित आणि विराटचं कमबॅक होणं निश्चित आहे. दोघेही अखेरीस आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलमध्ये खेळले होते.
रोहितसोबत कॅप्टन्सीबाबत वन टु वन!
रोहित-विराट करियरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमधून दोघांच्या भविष्याबाबतही निर्णय होणार आहे. मात्र रोहितकडे असलेल्या कर्णधारपदाबाबत निर्णायक चर्चा होणार आहे.
क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, निवड समिती आणि रोहित यांच्यात कॅप्टन्सीबाबत निर्णय होऊ शकतो. त्यामुळे रोहितबाबत काय निर्णय होणार? याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे. मात्र रोहितची ही फलंदाज म्हणून शेवटची मालिका असू शकते, अशीही चर्चा आहे. तसं न झाल्यास कर्णधार म्हणून हिटमॅनची अखेरची मालिका ठरु शकते.
रोहितनंतर कॅप्टन कोण?
रोहित शर्मा याच्याकडून जबाबदारी काढल्यास भारताच्या एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धुरा कुणाला मिळणार? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. वनडे कॅप्टन म्हणून श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि केएल राहुल या तिघांची नावं आघाडीवर आहेत.
श्रेयस प्रबळ दावेदार!
दरम्यान नेतृत्वासाठी शुबमन गिल, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या तिघांची नावं आघाडीवर आहेत. मात्र या तिघांपैकी श्रेयस अय्यर प्रबळ दावेदार आहे. श्रेयसने गेल्या काही वर्षांत स्वत:ला कॅप्टन आणि बॅट्समन म्हणून प्रत्येक फॉर्मेटमध्ये सिद्ध केलं आहे. त्यामुळे रोहितनंतर श्रेयसला संधी मिळू शकते.
