सांगली-कोल्हापूर महामार्गावर चिपरी (ता. शिरोळ) येथील फाट्यावर दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. या अपघातात संतोष शंकर विटेकर (37, रा.खोतनगर शहापूर रोड, तारदाळ, ता. हातकणंगले) व मोहम्मद हंजाल आताऊल्लाह आलम (21, सध्या रा. आवाडे पार्क हातकणंगले, मूळ गाव बिहार) हे दोघे मृत झाले.
अपघातप्रकरणी संमेत सुर्यकांत कुरडे (24, रा. नांदणी, ता. शिरोळ) याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी, शुक्रवारी संतोष विटेकर व त्याचा मित्र मोहम्मद आलम हे मोपेडवरून जयसिंगपूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यावेळी चुकीच्या दिशेने आलेल्या दुचकीने त्यांना धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जयसिंग पूर्व सांगली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबतची फिर्याद शंकर आप्पू विटेकर (रा. कळंबी, ता. मिरज) यांनी दिली आहे. अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.



