शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत PM किसानची 2000 रूपये ही रक्कम पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे.
आता ती आगामी काळात इतरही राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पीएम किसानची रक्कम आतापर्यंत पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता उर्वरित राज्यांमधील शेतकऱ्यांनाही दिवाळीपूर्वी या योजनेचे पैसे देण्याची सरकारची योजना असल्याची माहिती समोर आली आहे.
वार्षिक 6 हजारांची मदत
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांची मदत केली जाते. ही रक्कम प्रत्येक 4 महिन्यांनी 2-2 हजार या प्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. शेतकऱ्यांना या मदतीच्या माध्यमातून सक्षम करण्याची सरकारची योजना आहे. आता दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी पिकांची तयारी करण्यासाठी फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी pmkisan.gov.in ला भेट देऊन त्यांच्या ई-केवायसीचे अपडेट पाहू शकतात. आगामी काळात इतरही शेतकऱ्यांना या योजनेत सामील करण्याची सरकारची योजना आहे. त्यामुळे आगामी काळात जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
पीएम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करायची ?
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या CSC केंद्रात किंवा ऑनलाईन पोर्टलवरून https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. तिथे अर्ज करा आणि आधार कार्ड, जमिनीचा 7/12 उतारा, बँक खाते क्रमांक, मोबाइल नंबर आणि इतर माहिती भरा आणि केवायसी करा. यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात होईल.