‘लाडकी बहीण योजनेत’ ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. तथापि, तांत्रिक अडचणी आणि ई-केवायसी प्रक्रियेतील गोंधळामुळे हजारो पात्र महिला अद्याप लाभापासून वंचित आहेत.
राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी दिवाळीपूर्वीच आनंदाची बातमी समोर येत आहे.’मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत’ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यात लवकरच थेट ३००० रुपये जमा होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे अनेकांच्या सणासुदीला गोडी येणार आहे.
राज्यात योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत असून, अनेक पात्र महिलांना अद्याप त्यांच्या हक्काचा हप्ता मिळालेला नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून हजारो लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित आहेत. यामुळे नाराजी वाढली असून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यातील विविध भागांतील परिस्थिती अधिकच चिंताजनक असून, ई-केवायसी प्रक्रियेच्या अडचणींमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ओटीपी न येणे, तांत्रिक अडचणी, रात्रीच्या वेळी प्रक्रिया करण्याची वेळ अशा समस्यांनी महिलांची धावपळ सुरू आहे.
सरकारकडून योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्यात आली. यामध्ये ५२,११० महिलांचे कागदपत्रे पडताळण्यात आली असून त्यापैकी केवळ ३,५०० महिला ६५ वर्षांवरील किंवा एकाच कुटुंबातील एकाहून अधिक लाभार्थ्यांमध्ये होत्या. मात्र, उर्वरित ४८,५०० पेक्षा अधिक महिला पात्र असूनही त्या अद्याप लाभापासून वंचित आहेत.
ई-केवायसी साठी फक्त दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे मोठे आव्हान बनले आहे. तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक लाडक्या बहिणींची काळजी वाढली असून, “सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता मिळेल की नाही?” हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ई-केवायसी संदर्भातील तांत्रिक अडचणी सोडवण्याचे काम सुरु आहे. तसेच, पात्र महिलांना दोन्ही महिन्यांचे हप्ते मिळायला हवेत, असं सरकारचं मत आहे.
दरम्यान, जर निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण झालं नाही, तर हप्ता बंद होईल का यावर कोणताही अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींनी वेळीच प्रक्रिया पूर्ण करावी.
हप्ता मिळवण्यासाठी कागदपत्रे व तपशील अचूक भरावेत.
अधिक माहितीसाठी स्थानिक अंगणवाडी केंद्र किंवा महिला बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा.





