दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत भारताने आधीच 1-0 ने आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने विजय खूपच महत्त्वाचा आहे.
वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिल एका विक्रमांची नोंद करू शकतो. त्याचा फॉर्म पाहता हे शक्य आहे. मागच्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती. कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून शुबमन गिल फॉर्मात आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला. आता त्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला जाऊ शकतो.
शुबमन गिल कर्णधार म्हणून 1 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज होऊ शकतो. शुबमन गिलपूर्वी हा कारनामा ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांनी केली आहे. त्यांनी 11 डावात 1 हजार पूर्ण केल्या आहेत
शुबमन गिलने कर्णधार झाल्यानंतर 10 डावात 805 धावा केल्या आहेत. आता 196 धावा करताच त्याच्या कसोटी कर्णधार असताना सर्वात वेगाने 1 हजार धावा पूर्ण होणार आहेत. त्यामुळे शुबमन गिलच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. शुबमन गिलने 38 कसोटी सामन्यात 41.49 च्या सरासरीने 2697 धावा केल्या. यात 9 शतके आणि 8 अर्धशतके केली आहेत.
भारतासाठी कर्णधार म्हणून 1 हजार धावा कमी डावात पूर्ण करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी 15 डावात ही कामगिरी केली होती. हा विक्रम देखील शुबमन गिल आपल्या नावावर करू शकतो. धोनी आणि विराट कोहलीने 18 डावात ही कामगिरी केली. सचिन तेंडुलकरने 24, अझरूद्दीनने 25, पतौडीने 26, रोहित शर्माने 27, सौरव गांगुलीने 35 आणि कपिल देवने 40 डावात ही कामगिरी केली.




