रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी-टी20 फॉर्मेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आता फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. त्यात वनडे संघाचा कर्णधार बदलल्याने मोठी उलथापालथ झाली आहे. आता या दोघांच्या वनडेतील जागेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दोघांचं वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याबाबत संभ्रम आहे. हा प्रश्न प्रत्येक भारतीय खेळाडूंच्या डोक्यात घर करून आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिलने काही संकेत दिले आहेत. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. शुबमन गिलने पत्रकार परिषदेत विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत वक्तव्य केलं. त्याच्या वक्तव्यातून विराट कोहली आणि रोहित शर्माचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. शुबमन गिलला रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने दोघांची टीम इंडियाला गरज असल्याचं सांगितलं.
शुबमन गिल म्हणाला की, ‘रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. खूप कमी लोकांककडे इतकी प्रतिभा आणि अनुभव आहे. आम्हाला त्यांची वनडे संघात गरज आहे.’ शुबमन गिलच्या या वक्तव्यातून या दोघांच्या भविष्याचा अंदाज बांधला जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या रणनितीचा भाग असणार आहेत. शुबमन गिलने सांगितलं की, रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली बरंच काही शिकलो आहे. खेळाडूंशी मैत्री करण्यात आणि ड्रेसिंग रूममध्ये शांतता राखण्यात त्याचे अनुकरण करू इच्छितो.
शुबमन गिलकडे आता आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या काही संधी आहेत. शुबमन गिलकडे टी20 वर्ल्डकपनंतर संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच तिन्ही फॉर्मेटमध्ये संघाची बाजू सावरू शकतो. असं असताना वनडे वर्ल्डकप 2027, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027, टी20 वर्ल्डकप 2028 आणि ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याची संधी आहे. असं असताना शुबमन गिलने स्पष्ट केलं की, प्रत्येक फॉर्मेटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकू इच्छितो.




