पालघरच्या वाडा, अंबिस्ते खुर्द भारतीय समाज उन्नती मंडळ माध्यमिक आश्रमशाळेतील दोघा विद्यार्थ्यांनी एकाच झाडाला गळफास लावून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हे दोन विद्यार्थी मोखाडा तालुक्यातील राहणारे असून दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान दुसऱ्या एका घटनेत नंदुरबार येथील नवापूर तालुक्यातील खडकी आश्रम शाळेतील ६ वर्षीय विद्यार्थी लघुशंकेसाठी गेला असताना त्यावेळेस त्याच्या संशयतरित्या मृत्यू झाल्याचे उघडकीस आहे.
वाडाच्या अंबिस्ते खुर्द येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाच्या माध्यमिक आश्रमशाळेचे मोखाडा तालुक्यात रहाणारे दोन विद्यार्थी आश्रमशाळेच्या परिसरात एकाच झाडाला मृतावस्थेत लटकलेले आढळले.रात्री आश्रमशाळेचा वॉचमन परिसरात गस्त करत असताना त्याने हे विध्यार्थी झाडाला लटकल्याचे पहिल्यानंतर त्याने आश्रमाशाळेतील अधीक्षकांना ही माहिती सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ही घटना कळल्यानंतर पालघर लोकसभा खासदार हेमंत सावरा,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रकाश निकम, जव्हार प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर हे घटना स्थळी दाखल झाले असून या घटनेची माहिती घेत आहेत.
मुख्यध्यापक आणि अधीक्षक निलंबित
संस्थेने मुख्यध्यापक डी. जी. दाते आणि अधीक्षक राजू सावकारे यांचे निलंबन केले आहे. झालेली ही घटना दुःखदायक असून दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल तसेच विद्यार्थ्यांचे समुउपदेशन करण्याची आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत सावरा यांनी दिली आहे. या सर्व घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कार्यवाही करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल अशी प्रतिक्रिया पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली आहे. तसेच मुलांच्या पालकांनी देखील कारवाईची मागणी केली आहे.
नंदूरबार येथील नवापूर तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या खडकी आश्रम शाळेत एक सहा वर्षीय विद्यार्थी रात्री साडे दहाच्या सुमारास लघुशंकेसाठी गेला असताना तो खाली पडल्याचे आढळल्याने त्याला रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.आयान अंकेश गावित असे या मुलाचे नाव असून त्याच्या मृत्यू कारण नेमके कळलेले नाही.
या चिमुकल्याच्या मृत्यूने खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. खडकी आश्रम शाळेत पाहिलीत शिकणाऱ्या आयान अंकेश गावित या विद्यार्थ्यांचा मृत्यूचे कारण समजलेले नाही. आदिवासी विकास विभागाच्या खडकी शासकीय आश्रम शाळेतील या सहा वर्षीय विद्यार्थ्याला अकस्मात मृत्यु झाला आहे.
विद्यार्थ्याला कुठलाही आजार नव्हता
रात्री साडेदहाच्या सुमारास लघुशंकेसाठी हा विद्यार्थी शौचालयात गेला असता त्याठिकाणी खाली पडला होता. त्यानंतर त्याची तब्येत खराब झाल्याची माहिती आश्रम शाळेतील अधीक्षक यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच त्याला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी या विद्यार्थ्याला तपासून मृत घोषीत केले. या विद्यार्थ्याला कुठलाही आजार नसल्याचे दस्तुरखुद्द आदिवासी विकास विभागाचे म्हणणे आहे. मग त्याच्या अचानक झालेल्या मृत्युबाबत संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करावी आणि यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.




