एका 20 वर्षीय युवतीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घुन हत्या झाल्याची घटना तालुक्यातील बोंडराणी (अर्जुनी) गाव शिवारात 9 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
आचल प्रकाश कोबळे रा. बोंडराणी असे मृताचे नाव आहे.
बोंडराणी गाव वैनगंगा नदी काठावर आहे. कोबळे कुटुंबिय मासेमारी व शेतमजुरी करतात. आचलचे गावातीलच दुसर्या समाजातील एका युवकासोबत सूत जूळले होते. त्यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबियांकडून विरोध असल्याने ते पळून गेले होते. काही दिवसांपूर्वी ते गावात परत आले. दोन्ही कुटुंबात चर्चा झाल्यानंतर आचल वडीलांच्या घरी परतली. आचलच्या कुटुंबियानी तिच्यासाठी स्थळ बघीतले होते. आज तिला बघायला पाहुणे येणार होते. दरम्यान सकाळच्या सुमारास शेजारील महिलेला आचलच्या घरापासून काही अंतरावर ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने चिरल्याची जखम आढळली. याची माहिती महिलेने कोबळे कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी आचलला तिरोडा येथील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. आचलच्या भावाने पोलिसात तक्रार केली. तक्ररीच्या अनुषंगाने पोलिसानी स्वानपथकाला पाचारण केले. घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. आचलचे प्रेत येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आचलची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा आहे. घटनेचा अधिक तपास दवणीवाडा पोलिस करीत आहेत.
