हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील एका शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने संपूर्ण जिल्हा हादरला असून हा व्हिडिओ कधी काढला याबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही.
शैक्षणिक क्षेत्रात या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही लहान वयाच्या विद्यार्थ्यांना पट्ट्याने, क्रिकेटच्या बॅटने तसेच हातांनी निर्दयपणे मारहाण करताना काही जण दिसत आहेत. विद्यार्थ्यांना लाइनमध्ये उभे करून एकामागोमाग एक झोडपले जात आहे. काही मुले भीतीने थरथरत रडत आहेत, त्यांच्या आर्त हाका आणि भेदरलेले चेहरे पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
मारहाण करणारे विद्यार्थी स्वतःला मोठे समजून गावगुंडासारखा अविर्भाव दाखवत आहेत, तर निर्दोष लहान मुलांवर अमानुष अत्याचार करत आहेत. अशा प्रकारच्या रॅगिंगच्या प्रकारामुळे शैक्षणिक परिसरातील सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पालक वर्गात प्रचंड चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे. आपल्या लेकरांना शिक्षणासाठी आणि संस्कारांसाठी वसतिगृहात पाठवणारे पालक आता त्यांच्या सुरक्षेबद्दल साशंक झाले आहेत. विद्यार्थ्यांवर अशी मानसिक व शारीरिक छळवणूक होणे हे समाज म्हणून लाजिरवाणे असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच बालहक्क आयोगाने याची तत्काळ दखल घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.