अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाई करत मोठा झटका दिला आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि कार्यकारी संचालक अशोक कुमार पाल यांना बनावट बँक गॅरंटी रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर आर्थिक क्षेत्रात आणि शेअर बाजारात(stock market) मोठी खळबळ उडाली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई 68.2 कोटी रुपयांच्या बनावट बँक गॅरंटी प्रकरणाशी संबंधित असल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणात ओडिशातील बिस्वाल ट्रेडलिंक नावाच्या कंपनीचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे. या कंपनीमार्फत बनावट गॅरंटी तयार करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. ही कारवाई धनशोधन निवारण अधिनियम अंतर्गत करण्यात आली असून, या रॅकेटद्वारे कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप ED ने केला आहे.
ED च्या मते, अशोक कुमार पाल यांनी समूहाच्या निधीचा गैरवापर केला आणि आर्थिक घोटाळ्यात थेट भूमिका बजावली. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता आणि गैरकायदेशीर मनी ट्रान्सफर प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याचं ED च्या तपासात स्पष्ट झालं आहे.
या अटकेनंतर तपास यंत्रणांनी रिलायन्स समूहातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावलं आहे. अनिल अंबानी किंवा कंपनीकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, पुढील काही दिवसांत ED कडून आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवरही रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये(stock market) तब्बल 13% वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर 9 ऑक्टोबर 2020 रोजी फक्त ₹2.75 वर होता, तर 10 ऑक्टोबर 2025 रोजी त्याची किंमत ₹50.70 वर पोहोचली. म्हणजेच, गेल्या 5 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 1670% वाढ झाली आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्येही चर्चेचा विषय निर्माण झाला असून, आर्थिक जगतात या घडामोडीला मोठं महत्त्व दिलं जात आहे.








